कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील हे करतात. मग, वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे का टाळतात, प्रश्न विचारणाऱ्या सभासदांचा बोलताना ध्वनिविस्तारक (माईक) का बंद करतात, त्यामुळे प्रश्न संपणार नसल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवास थोरात यांनी केली.

निवास थोरात म्हणाले, प्रश्नांना उत्तरे न देता अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केलेली चिडचिड म्हणजे ‘खाई त्याला खवखवे’ अशीच आहे. ‘सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सामान्य सभासदांचे म्हणणे ऐकून न घेता सत्ताधाऱ्यांनी मनमानी केली. मी सभासद म्हणून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये कारखाना विस्तारीकरणासाठी किती कंपन्यांनी सहभाग घेतला, कोणत्या कंपन्यांनी निविदा भरली होती, कोणाला काम दिले गेले त्याची प्रत, कार्यवाहीची नक्कल (प्रोसिडिंग कॉपी) व करारनामा मागितले होते. मात्र, टुकार उत्तर देऊन अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सभाच गुंडाळल्याचा सरळसोट आरोप निवास थोरात यांनी केला.

थोरात म्हणाले, वास्तविक मी केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्तांनी सह्याद्री साखर कारखाना प्रशासनाला लेखी पत्र देऊन ही माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरी देखील ही माहिती त्यांनी दिलेली नाही, सभेत उत्तरे दिलेली नसल्याचे निवास थोरात यांनी सांगितले.

सह्याद्री साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्हा विरोधकांमध्ये एकी नसल्यानेच सत्ताधाऱ्यांचे फावले, म्हणजे त्याचा अर्थ कारखान्याचा कारभार स्वच्छ, पारदर्शी असल्याचे होत नसल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले. विरोधकांच्या दुही बाबत ते म्हणाले, लोकांकडून काही चुका होत असतात. पण, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे निवास थोरात यांनी या वेळी बोलताना सांगितले.