Fortuner Car Viral Video : राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. हुंड्याच्या रुपात सोने-नाणे आणि रोख रक्कम दिल्याने समाजातील रुढीवादी परंपरा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या. परिणामी अशा प्रथांना आळा घालण्याचीही मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, वैष्णवीच्या लग्नात वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडीही भेट दिली होती. त्यामुळे फॉर्च्युनर गाडी असलेल्या प्रत्येकाकडे आता संशयाने पाहिलं जातंय. यावरूनच सोलापुरातील एका फॉर्च्युनर गाडीच्या मालकाने त्याच्या गाडीच्या मागे भन्नाट मेसेज लिहिला आहे, या गाडीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात ५१ तोळे सोने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि फॉर्च्युनर गाडी भेट दिली होती. जवळपास कोट्यवधीपेक्षाही जास्त खर्च या लग्नात करण्यात आला होता. हगवणे कुटुंबियांकडून फॉर्च्युनर गाडीचाच हट्ट करण्यात आला होता, असाही दावा केला जातोय. इतकं सगळं देऊनही शेवटी वैष्णवीला मृत्यूला कवटाळावं लागलं. यावरुन समाजातील विदारक स्थितीही पुन्हा एकदा समोर आली.

दरम्यान, फॉर्च्युनर गाडी असलेल्या प्रत्येकाकडे आता संशयाने पाहिलं जातं. हुंड्यातच ही गाडी मिळाली असेल अशी खिल्ली उडवली जातेय. त्यामुळे सोलापुरातील एका गाडी मालकाने त्याच्या गाडीच्या मागेच एक संदेश लिहिलाय. “मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी; मी फॉर्च्युनर, रुबाबबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा; अतुल भाऊंनी मला रोखत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलंय!” असं या गाडीच्या मागे लिहिलंय.

हगवणे कुटुंबियांमुळेच फॉर्च्युनर बदनाम, आम्ही कष्ट करून गाडी घेतली

“वैष्णवी ताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.खूप कष्टाने फॉर्च्युनर गाडी घेतली. सर्वसामान्य किंवा शेतकऱ्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची म्हणजे दोन तीन वर्षे पैसा जमा करायला लागतो, किंवा बँकेचं लोन करावं लागतं. पण हगवणे कुटुंबियांमुळे फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे. हगवणे कुटुंबियांमुळे बदनाम झालेल्या फॉर्च्युनर घेऊन आम्ही कुठेही गेलो तरीही आम्हाला विचारलं जातं की गाडी तुमची आहे की सासऱ्याची आहे? त्यामुळे कष्ट करणाऱ्या मुलाला मुलगी दिली तर वैष्णवीसारखी प्रकरणे होणार नाहीत”, असं या गाडीच्या मालकाने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी शेअरही केला आहे.