अलिबाग– गेली ११ वर्ष रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बाह्यवळण रस्त्यांची काम आता पून्हा सुरू होणार आहेत. शुक्रवारी दोन्ही कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. मात्र या कार्यक्रमातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वादाची किनार पहायला मिळाली. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर तसेच बॅनरवर शिवसेनेचे मंत्री मंत्री भरत गोगावले यांना स्थान देण्यात न आल्याने, गोगावले यांना पुन्हा डावलल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नसल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या निधीतून उभारण्यात आलेल्या रोहा शहरातील नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला होता. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतही मंत्री भरत गोगावले यांना स्थान देण्यात आले नव्हते. गोगवले यांनी यावर संताप व्यक्त करतांना राजशिष्टाचार न पाळणाऱ्या रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी मधील पुन्हा एकदा ताणले गेले होते.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पार पडलेल्या बाह्यवळण रस्त्यांच्या भूमिपूजन संमारंभात पुन्हा एकदा मंत्री भरत गोगावले यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेली अकरा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे इंदापूर आणि माणगाव पट्ट्यात वारंवार वाहतुक कोंडीची समस्या उद्भवते आहे. हीबाब लक्षात घेऊन आता नविन ठेकेदार नेमून ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.

नवीन ठेकेदारांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेत या दोन्ही बाह्यवळण रस्त्यांच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन शुक्रवारी केले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्याला मंत्री आदिती तटकरे आणि भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र मंत्री भरत गोगावले यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा गोगावले यांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाद यामुळे आणखिन विकोपाचा जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान या कार्यक्रमासाठी भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना निमंत्रित करण्यात आले असले तरी त्यांनी कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले. तर मंत्री आदिती तटकरेही गैरहजर राहिल्या.