अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी दिघी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या (सोसायटी) अध्यक्षांसह चार संचालकांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात आली आहे. सहकार विभागाचे सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांनी हा आदेश दिला.
सेवा संस्थेचे अध्यक्ष सोपान अंबादास नागवडे, संचालक शोभा सुनील निकम, दत्तात्रय रामराव दळवी व मच्छिंद्र रावसाहेब गवळी या चार जणांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. या संदर्भात देविदास नागवडे यांनी, दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सहायक निबंधकांकडे लेखी तक्रार केली होती. सोपान नागवडे, शोभा निकम, दत्तात्रय दळवी व मच्छिंद्र गवळी हे चार संचालक दि. ३० जून २०२४ अखेरपर्यंत थकबाकीदार होते. सहकारी संस्था कायद्यानुसार थकबाकीदार व्यक्ती निवडणुकीसाठी उमेदवार वा मतदार म्हणून अपात्र ठरते. परंतु या थकबाकीदारांनी २५ मार्चला झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत भाग घेतला. सोपान नागवडे अध्यक्षपदी निवडून आले, याकडे तक्रार अर्जात लक्ष वेधण्यात आले.
याशिवाय संस्थेच्या निवडणुकीच्या दिवशीच संपत ब्राह्मणे, शिवाजी निकम व इतर संचालकांनीही आक्षेप घेत सहायक निबंधकांकडे चौघांविरुद्ध अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत सहायक निबंधकांनी सुनावणी घेतली. संबंधित संचालकांचा जबाब नोंदवून घेत चौकशी करून वरील चार संचालकांना पाच वर्षांसाठी अपात्र करण्याचा आदेश दिला. दिघी सेवा संस्थेमध्ये एकूण १३ संचालक आहेत. त्यांपैकी चार जण अपात्र झाल्याने सोसायटीच्या सत्तेतही बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे नेवासे तालुक्यातील राजकीय व सहकार वर्तुळात घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे.