विदर्भातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, गेल्या ४८ तासात आणखी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
गेल्या ४८ तासात कांशीराम टेंभरे ( कुऱ्हा, जि. वाशिम), विजय बेरकर (कातलीबोरा, जि. चंद्रपूर), विनोद ऐकुनकर (आष्टा, जि. यवतमाळ) आणि प्रमोद भोयर (सेवाग्राम, जि. वर्धा) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी सांगितले. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. ज्या शेतकऱ्यांना ती मिळाली, तीही अत्यल्प आहे. अलिकडे जिल्हा प्रशासन आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेद्वारे पश्चिम विदर्भाच्या सहा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांमधील नैराश्याची पातळी मोजण्यात आली. त्यानुसार सर्वाधिक नैराश्य असलेले ४ लाख ३४ हजार २९१ आणि नैराश्याच्या मध्यम पातळीवर असलेले ९ लाख १४ हजार ६५४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्वेनुसार आत्महत्यांचे प्रमुख कारण कर्जबाजारीपणा असल्याचे म्हटले आहे. आत्महत्या करण्यासाठी आठ घटक निश्चित करण्यात आले. त्यात कर्जबाजारीपणामुळे ९३ टक्के, आर्थिक पतनामुळे ७४ टक्के, कौटुंबिक वादामुळे ५५ टक्के, नापिकीमुळे ४१ टक्के, सामाजिक प्रतिष्ठेसाठी ३६ टक्के, मुलगी/बहिणीच्या लग्नासाठी ३४ टक्के, व्यसनाधिनतेमुळे २८ टक्के आणि आरोग्याच्या समस्यांमुळे २१ टक्के आत्महत्या झाल्याचे या सव्र्हेत म्हटले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनावरून घुमजाव केला आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांना आता सल्ला देत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकऱ्यांना दिलासा देणारे एकही आश्वासक पाऊल पडलेले नाही, असेही तिवारी म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2015 रोजी प्रकाशित
विदर्भात आणखी चार शेतकऱ्यांची आत्महत्या
विदर्भातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, गेल्या ४८ तासात आणखी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

First published on: 21-04-2015 at 12:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four farmers commit suicide in vidarbha