अहिल्यानगर : अवसायनात निघालेल्या अहमदनगर अर्बन सहकारी (बहुराज्यीय) बँकेच्या ठेवीदारांना उर्वरित ३५ टक्के रक्कम लवकरच वितरित केली जाईल, त्यासाठी नियोजन सुरू आहे, अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.नगर अर्बन बँकेचा बँकिंग व्यवसायाचा परवाना भारतीय रिझर्व बँकेने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी रद्द केला व त्यानंतर बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांच्या काळात थकीत कर्जाची वसुली प्रक्रिया वेगाने राबवून १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत बँकेच्या २२१५ ठेवीदारांच्या ६५ टक्के रकमा परत करण्यात आलेल्या आहेत. आता उर्वरित ३५ टक्के रकमा परत करण्याचे नियोजन सुरू असून, या रकमाही लवकरच वितरित केल्या जातील.
बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर बँकेच्या दैनंदिन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने भाडेतत्त्वावरील सर्व शाखा बंद करण्यात आलेल्या आहेत. स्वमालकीची कार्यालयेही बंद करून त्यांचे कामकाज मुख्य शाखेत वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेच्या दैनंदिन खर्चात मोठी बचत झाली आहे.याबरोबरच थकबाकीदारांनी थकीत कर्ज वसुली, तारण मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलावही प्रक्रिया ही वेगवान करण्यात आली आहे. त्यामुळे जुलै २०२५ अखेर २२१५ ठेवीदारांना ५० टक्के रक्कम म्हणजे ९६ कोटी १६ लाख रुपये तर १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १५ टक्के रक्कम म्हणजे २८ कोटी ८४ लाख रुपये परत करण्यात आले आहेत.
ज्या खातेदारांनी आपली केवायसी कागदपत्रे अद्याप बँकेकडे जमा केली नाहीत, त्यांनी तत्काळ कागदपत्रे आपल्या नजीकच्या शाखेत, मुख्यालयात जमा करावीत. त्याचबरोबर थकीत कर्जदारांनी थकबाकीची रक्कम बँकेकडे भरून प्रशासनास सहकार्य करावे असे, आवाहन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.