“भाईंना शो करायची सवय आहे. जसे काही पूर्वी काही शोमॅन होते. राज कपूर पूर्वी शो मॅन म्हणून ओळखले जायचे. तशाप्रकारची सवय त्यांना लागली आहे,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अशा शब्दांमध्ये टीका करणारे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना शिंदे यांच्या खासदार पुत्राने उत्तर दिलं आहे. राज्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सत्तांतरणानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवानिमित्त अनेक नेत्यांच्या घरी भेटीगाठी देत आहेत. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे पक्ष सचिव मिलिंद नार्वेकरांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणेंपर्यंत आणि उद्योगपती मुकेश अंबांनीपासून आमदार प्रसाद लाड यांच्यापर्यंत अनेकांच्या घरी शिंदे मागील काही दिवसांमध्ये गणेश दर्शनासाठी जाऊन आले आहेत. मात्र याच गणपती दर्शनाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी टोला लगावल्यानंतर त्या टोल्यावरुनच शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी फिल्मी स्टाइल उत्तर दिलं आहे.

नक्की पाहा >> CM शिंदेंच्या निवासस्थानी फडणवीसांना मिळाला आरतीचा मान तर PM मोदींनी ‘या’ नेत्याच्या घरी केली गणपतीची आरती; पाहा Photos

अजित पवार काय म्हणाले?
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांना राजकीय वर्तुळामध्ये ज्या ‘भाई’ या नावाने ओळखलं जातं तोच उल्लेख करत अजित पवारांनी टोला लगावला. “आधीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या दर्शनाला गेलेलं आठवत नाही. आम्ही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा घेऊन जात नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना आता मात्र चित्र बदलल्याचा संदर्भ अजित पवार यांनी दिला आहे. “पण आता कशी गाडी एन्ट्री करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, मग कोणतरी उतरतं. मग नमस्कार करतात. कशाला हे?” असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

“जो गणेशभक्त आहे. त्याने अशापद्धतीने देखावा दाखवण्याचं कारण नाही. तुमच्या मनात ठेवा ना,” असा सल्ला अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला. “भाईंना शो करायची सवय आहे. जसे काही पूर्वी काही शोमॅन होते. राज कपूर पूर्वी शो मॅन म्हणून ओळखले जायचे. तशाप्रकारची सवय त्यांना लागली आहे. आता त्याला काय करायचं? जनतेनेच बघावं आता काय चाललंय आणि काय नाही,” असंही विरोधी पक्षनेते असणाऱ्या अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> अंबरनाथ, डोंबिवली गणपती दर्शन भ्रमंतीत श्रीकांत शिंदे यांचा सोमवारी पहाटे कल्याणमधील चहा-मलई पाववर ताव

अजित पवारांना शिंदे पुत्राने दिलं प्रत्युत्तर
अजित पवार यांनी शिंदेंवर टीका केल्यानंतर शिंदे यांच्या पुत्राने ट्विटरवरुन अजित पवारांना टोला लगावला आहे. “दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… हा ‘शो’ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा,” असं ट्वीट श्रीकांत शिंदेंनी केलं आहे. तसेच, “हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली? पिक्चर अभी बाकी है’” असंही श्रीकांत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार आणि सुप्रियांमध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यावरुन स्पर्धा सुरु असल्याचं म्हणत टोला…
शिंदेगटाचे प्रवक्ते असणाऱ्या नरेश म्हस्के यांनी, “मी मुख्यमंत्र्यांविरोधात बोललो नाही तर माझं विरोधीपक्ष नेतेपद मोठे पवारसाहेब काढून घेतील ही भीती असावी म्हणून सुद्धा ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत असावेत,” असा टोला अजित पवारांना लागवला आहे. “आता जी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी दादा आणि ताईंची (सुप्रिया सुळेंची) जी चढाओढ सुरु आहे ती पाहून मला एकच संवाद आठवतो तो म्हणजे, दया कुछ तो गडबड हैं,” असा चिमटाही म्हस्के यांनी काढला आहे.