शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता ठाकरे गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते ‘शिवगर्जना’ यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत.
याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बीड येथे सभा घेणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंना लोकांनीच शिवसेनेतून हकललं आहे, त्यामुळे आता कितीही सभा घेतल्या तरी काहीही उपयोग होणार नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. ते जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, “गेली अडीच-तीन वर्षे लोक अडचणीत होते. लोक मरत होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी घरातून पाय बाहेर काढला नाही. आता त्यांना उशिरा शहाणपण सुचलं आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत. महागाई दिसत आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
हेही वाचा- ५०० कोटींचा घोटाळा: उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय तुरुंगात जाणार? किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, आता लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकललं आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी आता कितीही सभा घेतल्या, तरी काहीही उपयोग होणार नाही. लोकांनी एकदा त्यांना संधी दिली होती, उद्धव ठाकरे यांनी या संधीची माती केली.