मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ( २७ ऑगस्ट ) कोकणात पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी बोलताना मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ही यात्रा शांततेच्या मार्गाने निघाली आहे. यापुढील यात्रा शांतेतत नसणार आहे. तुम्हाला किती गुन्हे दाखल करायचे, ते करा, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अमित ठाकरे म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गावरून यात्रा काढण्यात यावी, असं राज ठाकरे यांचं मत होते. १७ वर्षे झालं रस्त्याचं काम सुरु असून, १५ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यावरील खड्डे जनतेला दाखवण्यात यावे, म्हणून यात्रा काढत आहे.”
“…अन् याचं उत्तर रविंद्र चव्हाण यांनी द्यावं”
“गोवा-मुंबई महामार्गावर अडीच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय बोलणार आहात? याचं उत्तर रविंद्र चव्हाण यांनी द्यावं. मनसैनिक टोल नाक्यावर बाउंसर किंवा अनधिकृत काम करणाऱ्या कंत्राटदारांसाठी नाहीत. ते महाराष्ट्रातील जनतेसाठी आहेत,” असं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी लिहिलेल्या पत्राला अमित ठाकरे यांनी दिलं.
हेही वाचा : “नितीन देसाईंना मरू दिलंत, अन् सनी देओलसाठी दिल्लीतून…”, संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप
“…तरीही रस्त्यावर खड्डे दिसत आहेत”
भाजपाच्या नेत्यांनी रस्त्याची पाहणी केली असून, अनेक खड्डे बुजावण्यात आले आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यावर अमित ठाकरे यांनी म्हटलं, “ही मनसेची दहशत आहे आणि राहणारच. रस्त्याचं काम वेगाने सुरू झालं आहे. तरीही, रस्त्यावर खड्डे दिसत आहेत. नवीन बनवण्यात आलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत.”
“राज ठाकरे यांनी दहशत निर्माण केली”
महामार्गाबाबत रवींद्र चव्हाण यांनी चर्चासत्र घेतलं आहे. हा यात्रेचा प्रभाव आहे का? चर्चासत्रात सहभागी होणार का? असं प्रश्न विचारल्यावर अमित ठाकरे म्हणाले, “हा राज ठाकरे यांचा प्रभाव आहे. राज ठाकरे यांच्या दहशतीमुळेच मंत्र्यांनी रस्त्यांची पाहणी केली. महाराष्ट्रातील जनतेसाठी लढून-लढून राज ठाकरे यांनी दहशत निर्माण केली आहे.”
हेही वाचा : “सकाळी ९ वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री…”; परभणीत देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
“आम्ही लोकांसाठी लढत राहणार”
“आम्ही चर्चा सत्रात सहभागी होणार नाही. शेवटचं सांगतो, ही यात्रा शांततेच्या मार्गाने निघाली आहे. यापुढील यात्रा शांततेत नसणार आहे. तुम्हाला किती गुन्हा दाखल करायचे, ते दाखल करा. आम्ही लोकांसाठी लढत राहणार,” असा निर्धार अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.