सावंतवाडी : गोवा राज्यातील विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील हजारो कामगारांवर अन्याय होत असून, गोवा सरकारने लागू केलेला ‘एस्मा’ कायदा मागे घेण्याची मागणी या कामगारांनी केली आहे. या संदर्भात, सिंधुदुर्गातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांची भेट घेत माजी मुख्यमंत्री तथा उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही बाब घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे साकडे घातले आहे.

गोवा येथे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील सुमारे २-३ हजार कामगार विविध आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून गोवा सरकारने फार्मास्युटिकल कामगारांवर ‘एस्मा’ (Essential Services Maintenance Act) कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे कामगारांचा आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेण्यात आला आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे. कामगारांच्या म्हणण्यानुसार, गोवा येथील सिप्ला, मार्कसन, तेवा अशा अनेक फार्मास्युटिकल कंपन्या या ‘एस्मा’ कायद्याचा गैरवापर करत आहेत. कंपन्या विनाकारण कामगारांना कामावरून काढत आहेत, त्यांची हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमसारख्या परराज्यांमध्ये बदली करत आहेत, आणि त्यांना धमकावण्याचे प्रकारही सुरू आहेत.

या अन्यायाचा फटका सिंधुदुर्गातील ६० पेक्षा जास्त कामगारांना बसला आहे. त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले असून, काहींची बदली परराज्यात करण्यात आली आहे. यामुळे या सर्व कामगारांवर सध्या मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. यापूर्वी, अन्यायग्रस्त कामगारांनी गोवा पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करत ‘एस्मा’ कायदा मागे घेण्याची मागणी केली होती. दोन-तीन वेळा आंदोलन करूनही सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. गोव्यामधील भाजप सरकार कंपनी व्यवस्थापनाच्या मर्जीनुसार काम करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या अन्यायग्रस्त कामगारांनी भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाविरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे, या कामगारांनी माजी खासदार विनायक त्यांची भेट घेतली यावेळी प्रतिनिधी म्हणून दत्तप्रसाद राऊळ, विठ्ठल नाईक, सुयोग पालव, राजेंद्र सरनोबत, दिनेश खोटावले आधी उपस्थित होते. सर्वांनी आपल्यावर झालेल्या अन्याय विरोधात आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही बाब घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ उपस्थित होते.