नांदेड : इतिहास घडला पाहिजे आणि इतिहास घडवता येतो, ६ डिसेंबर १९९२ रोजी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात अयोध्येत इतिहास घडला. कारसेवकांनी अयोध्येतील तीन घुमट पाडताना या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. त्यांच्या मनात काय होते, ते देव जाणे, असा गौप्यस्फोट राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केला.

येथील अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सोमवारी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, सचिव वनिता जोशी, प्राचार्य एम. वाय. कुलकर्णी, उपप्राचार्या कल्पना कदम आदींची उपस्थिती होती. राज्यपाल बागडे यांनी या कार्यक्रमात राजकीय भाषणच केले.

राज्यपाल बागडे म्हणाले, ‘डॉ. शंकरराव चव्हाणांनी गृहमंत्री या नात्याने अयोध्येचा दौरा केला, तेथे मशीद कुठे आहे? असे त्यांनी विचारले. तेव्हा लोकांनी मशीद नाही केवळ तीन घुमट आहेत, तेथे नमाज अदा होत नाही, असे सांगितले. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येत घडत असलेल्या प्रसंगांमुळे तेथे लष्कर पाठविण्याच्या मागणीसाठी शरद पवार आणि एक खासदार पंतप्रधान नरसिंहराव यांच्या भेटीला गेले; तेव्हा नरसिंहराव देवपूजा करीत असल्याचा निरोप त्यांना मिळाला. नरसिंहराव पूजा आटोपून बाहेर आले, तोपर्यंत अयोध्येत इतिहास घडला होता.’

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांविधानिक जबाबदारी सांभाळतानाच मराठवाड्याच्या विकासाला गती देण्याचे मोलाचे काम केल्याचे सांगितले.

जनसंघातील प्रचारकांच्या कष्टाचे फलित

जनसंघात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करतो. पंडित दीनदयाल उपाध्याय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आदींनी कधी पायी तर कधी सायकलवरून प्रवास करून पक्षाचा प्रचार केला. प्रचारकांना विरोधक भाषणातून टोमणे मारायचे, हिणवायचे; पण अनेक अडचणींचा सामना करत ही माणसे आपल्या विचारांवर ठाम राहिली. तत्त्वांशी कुठलीही तडजोड न करता स्वतःचा, परिवाराचा विचार न करता आपले संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्राला समर्पित केले. त्यांची नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, कष्टाचे, परिश्रमाचे आणि चिकाटीचे फळ आज आपल्याला मिळाले आहे, असे राज्यपाल बागडे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्यामुळे पक्ष आणखी बळकट होण्यास मदत होईल. त्यांचे वडील डॉ. शंकरराव चव्हाण हे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते. वडील आणि मुलगा या दोघांनाही मुख्यमंत्री होण्याचा मान महाराष्ट्रात अन्य कोणत्याही परिवाराला मिळालेला नाही. हा योग केवळ चव्हाण कुटुंबातच घडला, असे राज्यपाल बागडे म्हणाले.