गेल्या दोन वर्षांपासून तयारी करून ‘दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र आणि गावात राजेंद्र’, अशी घोषणा द्यायची आणि मैदान मारायचं, असं एका राजू नामक कार्यकर्त्याने मनोमनी ठरवलं होत. त्यासाठी गावातली कुठली भिंत रंगवायची, मोबाइलच्या पडद्यावर कुठल्या वेशातील फोटो द्यायचा आणि घोषणा सर्वमान्य करायची, याचा विचारही झाला होता.
गेल्या आठवड्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालं आणि सरपंच होण्याचं स्वप्न पुरतं विस्कटलं. वर नरेंद्र, मधी देवेंद्र आणि गल्लीत राजेंद्र अशी तर जुळणी होईल का, याचा विचार करताकरता महिला आरक्षणाने कारभारीन तरी सरपंच हुईल आणि गॅसबत्तीचा मान तरी मिळेल, असे वाटल्याने राजूला जन्माचं सार्थक झाल्याचं सध्या तरी वाटायला लागलंय.
इकडे नाही तर तिकडे जाऊ!
राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रशासकीय स्तरावर निवडणुकीच्या पूर्वतयारीला जोर आल्याने लवकरच ‘स्थानिक’ निवडणुकांचा बिगूल वाजण्याचा अंदाज आहे. राज्यात महायुती व महाविकास आघाडी ‘स्थानिक’ निवडणुका एकत्रित लढतात की स्वबळ आजमावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले. युती व आघाडीत लढण्याचा निर्णय झाल्यास तळागाळातील इच्छुक कार्यकर्त्यांना मर्यादित संधी मिळेल. त्यातच प्रत्येक पक्षात गटातटाचे राजकारण शिगेला पोहोचले.
त्यामुळे कुठल्या गटाच्या कुणाला संधी मिळेल, हे देखील अनिश्चित आहे. राजकीय कट्ट्यांवर याची चांगलीच चर्चा रंगली. एका इच्छुकाने आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. उमेदवारी मिळते की नाही? याची मनात धाकधूक लागून असल्याचे तो म्हणाला. त्यावर दुसरा पदाधिकारी म्हणाला, ‘काळजी करू नका, इकडे संधी नाही मिळाली तर तिकडे जाऊ, अनेक पर्याय आहेत.’ हे चित्र जागोजागचे आहे.