लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर सकल मराठा समाजाने पुन्हा उचल खाल्ली असून शनिवारी सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता आंदोलन करून वाहतूक रोखण्यात आली होती. सोलापूर शहरासह मोहोळ, बार्शी, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला व अन्य ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. मोहोळ येथे नववधू-वराने आपला अक्षता सोहळ्याचा मुहूर्त बाजूला ठेवून रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता.

मोहोळ-पंढरपूर मार्गावर दुपारी ॲड. श्रीरंग लाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो मराठा नागरिक उतरले होते. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबली होती. तेथे जवळच एका मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यात अक्षता मुहूर्त समीप आला असताना नववधू-वर अक्षता सोहळा बाजूला ठेवून थेट वरातीसह आंदोलनस्थळी पोहोचले. डोक्यावर बांधलेल्या मुंडावळ्यांसह नवरदेव प्रमोद विलास टेकळे (रा. पापरी, ता. मोहोळ) आणि नवरी प्रियांका अर्जुन मुळे (रा. ढोक बाभुळगाव, ता. मोहोळ) हे नवदाम्पत्य ‘आधी लगीन मराठा आरक्षणाचे मग आमचे’ अशा निर्धारासह रास्ता रोको आंदोलनात फतकल मारून बसले. त्यांच्यासोबत वऱ्हाडी मंडळीही आंदोलनात उतरली होती.

आणखी वाचा-“ही तुतारी आहे की पुंगी?”, आव्हाडांचा तुतारी वाजवतानाचा VIDEO शेअर करत मिटकरींचा चिमटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापुरात कोल्हापूर रस्त्यावर मरिआई चौकात सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. बार्शी तालुक्यातील पानगाव, सांगोला तालुक्यातील पाचेगाव आणि वाकी शिवणे, मोहोळ तालुक्यातील अंकोली, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. करमाळा शहरातही रास्ता रोको आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.