सातारा: सातारा येथील वस्तू सेवाभावनातील दोन राज्य कर निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना सापळा रचून पकडले. त्यांना २५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. रोहन सतीश देवकर ( देगाव ता. वाई) अक्षय मोहन फडतरे (देगाव ता. सातारा) असे या निरीक्षकांचे नाव आहे.

जीएसटी करामधील टूबी आणि थ्रीबी वर्ग (क्लास) मधील दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी २०२२- २३ मध्ये भरलेल्या जीएसटी शीर्षकात काही रकमेचा फरक पडला. त्यामुळे त्यांना दंड झाला.

या दंडावरील व्याज माफ करून घेण्यासाठी त्यांनी जीएसटी कार्यालय सातारा येथे राज्यकर निरीक्षकांकडे अर्ज केला होता. निरीक्षकांनी या कामाच्या संदर्भात त्यांना तीस हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष राजेश वाघमारे यांच्याकडे तक्रार नोंदवली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पाटील, नीलेश राजपुरे, गणेश ताटे, नीलेश चव्हाण, अजय देशमुख या पथकाने विक्रीकर सेवाभावनाच्या परिसरात सापळा रचला आणि देवकर व फडतरे या करनिरीक्षकांना वीस हजारांची लाच घेताना पकडले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.