जालना : अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना मदतीच्या संदर्भात पैशाचे सोंग आणता येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी येथे माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या सपकाळ यांनी सांगितले, की मंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचे दौरे केल्यानंतर लगेच मंत्रिमंडळ बैठक घेऊन मदतीचा निर्णय घ्यावयास हवा होता. पिकांचे नुकसानच एवढे झालेले आहे, की त्यासाठी पंचनाम्याची गरज नाही. राज्याने अद्याप केन्द्राकडे मदतीचा प्रस्तावही पाठविलेला नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात माझ्या खिशात पैसे नाहीत, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले असून, हे वक्तव्य बेताल आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

संपूर्ण कर्जमाफी करावी, पंचनामे करण्याऐवजी पीकहानीबद्दल सरसकट प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनींना प्रतिहेक्टरी पाच लाख रुपये मदत द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणे त्याचप्रमाणे खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांना द्यावेत, इत्यादी मागण्या सपकाळ यांनी या वेळी केल्या.

एका नेत्याला पंतप्रधानपदाचे स्वप्न

अंजली दमानिया यांनी केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलांच्याबाबत काही आरोप केल्याच्या संदर्भात माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता, महाराष्ट्रातून पंतप्रधान होण्याचे स्वप्न एका माणसाला पडत असल्याचे उत्तर त्यांनी दिले. दोन व्यक्ती ज्याप्रमाणे केंद्रात ‘आका’ आहेत, तशीच राज्यात एक व्यक्ती आहे. देवेन्द्र फडणवीस यांना उद्देशून आपण हे वक्तव्य करीत आहात का, असा प्रश्न विचारला असता सपकाळ म्हणाले, ‘यापूर्वीच आपण पुणे येथे याबाबत बोललेलो आहोत.’ या वेळी खासदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेन्द्र राख उपस्थित होते.