पंढरपूर : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास सहा तालुक्यांतील ८२ गावांमध्ये पाणी शिरले. सद्यस्थितीत या गावांमधून पाणी कमी होत आहे किंवा अनेक गावांमधून पाणी पूर्णपणे ओसरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणाकडून या सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. पूरग्रस्त भागात स्वच्छतेची कामे व उपाययोजना करण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहीम हाती घेण्यात आलेल्या असून, या सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती जंगम यांनी दिली. पूर नंतर आजारांची लागण, दूषित पाणी व घाण साचून राहणे यातून गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरोग्य व स्वच्छता मोहीम घेण्यात आली आहे. सर्व ८२ गावांतील सार्वजनिक ठिकाणी मोहीम सुरू राहणार आहे.
शाळा व अंगणवाडीत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ब्लीचिंग पावडर, फिनाईल, क्लोरीन इ. द्वारे रस्ते, पाणी व सार्वजनिक जागा निर्जंतुक करण्यात येत आहे. पाण्याच्या टाक्या व विहिरी स्वच्छ करणे. क्लोरीन टॅब्लेट/उकळलेले पाणी वापरण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा बाधित स्त्रोत तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध करून देण्यात आला आहे. डासमुक्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडे फॉगिंग मशीन उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी ते करण्यात येत आहे. साचलेले घाण पाण्यात डासांची निर्मिती होऊ नये म्हणून ऑईल फवारणी करण्यात येत आहे. तात्पुरते निवारा केंद्राच्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थापन करण्यात आले आहे. ग्रामस्थ या केंद्रातून घराकडे स्थलांतरीत होत आहेत. पुरानंतर लगेच स्वच्छतेची योग्य उपाययोजना हाती घेतल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन, नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधून कार्यक्षमतेने काम करण्यात येत आहे, असे जंगम यांनी यावेळी सांगितले.