मेळघाटातील आदिवासी रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी आता भुमकांची (मांत्रिक) मदत घेतली जात असून आरोग्य विभागामार्फत या भुमकांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन धारणी आणि चिखलदरा तालुक्यात करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>गडचिरोली: भामरागड तालुक्यातील दुचाकी रुग्णवाहिकेचा फसवा प्रयोग; प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांची चमकोगिरी
रुग्ण कल्याण समितीच्या वतीने भुमकांना एका रुग्णामागे शंभर रुपये मानधन दिले जाते. मेळघाटामधील बालमृत्यू रोखण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयासह अन्य विभागांना एकत्र घेऊन ‘मिशन मेळघाट’ योजना राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने या भागातील आदिवासींमध्ये भुमकाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असून लहान मूल आजारी पडल्यानंतर सर्वप्रथम आदिवासी मुलाला घेऊन उपचारासाठी भुमकांकडे जातात. भुमकांकडून करण्यात येणाऱ्या अंगारे-धुपाऱ्यावर या आदिवासींची श्रद्धा असल्याचे लक्षात घेऊनच या भुमकांच्या माध्यमातून आजारी लहान मुलांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी पाठविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
हेही वाचा >>>नागपूर: समलैंगिक विवाहांमुळे भारतीय संस्कृतीला धोका नाही! डॉ. सुरभी मित्रा यांची ग्वाही
सध्या या भागात जवळपास एक हजार भुमका असून त्यांना प्रतिरुग्ण शंभर रुपये मानधन दिले जाते. शासनाकडून पूर्वी आर्थिक मोबदला मिळत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याकडे भुमकांचा कल दिसत नव्हता. पण, आता तज्ज्ञ डॉक्टर त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. यापुर्वीही भुमकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
भुमका-पडिहार यांचा मेळघाटातील जनमानसात मोठ्या प्रमाणात पगडा आहे. गावातील निर्णय प्रक्रियेसह आजारादरम्यान घरगुती औषधोपचारात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांचे मत परिवर्तन करून त्यांना शास्त्रोक्त आरोग्य शिक्षणाकडे वळवणे, प्रशिक्षित करणे या हेतूने काही महिन्यांपुर्वी समाज कल्याण व जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेत २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भुमकांना सामुहिक स्तरावर हे बक्षीस दिले जाणार आहे.