scorecardresearch

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे

(संग्रहित छायाचित्र)

सावंतवाडी : कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला असून  मंगळवार दि.१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता निर्णय दिला जाईल. असे जिल्हा सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी दोन्ही बाजूंच्या वकीलाना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अ‍ॅड प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अ‍ॅड सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला.

आमदार  राणे यांच्या जामीन अर्जावर  मंगळवारी दुपारी ३ वाजता निकाल देणार असल्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जामीन अर्जावर निकाल होईपर्यंत आमदार राणे यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड प्रदीप घरत यांनी केली. मात्र ही मागणी जिल्हा न्यायालयाने अमान्य करीत आ. राणे यांना न्यायालयातून जाण्याची मुभा दिली आहे. याबाबतचा निकाल देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांत जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते या दरम्यान पोलिसांनी कारवाई करु नये अशी राणे यांना मुभा दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख  संतोष परब यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नितेश राणे यांनी सादर केलेलं अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे.

याप्रकरणी जिल्हा न्यायालयात आज सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या तात्काळ अटकेची मागणी करण्यात आली. तर बचाव पक्षाने हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा मुद्दा मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्य मंगळवारी दुपारी ३ वाजता याबाबतचा निकाल जाहीर करणार असल्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आमदार राणे यांचे सचिव राकेश परब कणकवली पोलीस ठाण्यात सकाळी हजर झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hearing on nitesh rane s bail application today zws