जालना : जालना शहरासह जिल्ह्यातील तीन तालुक्यांत रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला. जालना, अंबड आणि बदनापूर या तीन तालुक्यांतील दहा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. या पावसाने जालना शहरात कुंडलिका नदीच्या पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे जालना बसस्थानकातील बस काही काळ बंद ठेवण्यात आल्या. तर, बाहेरच्या गाड्याही बसस्थानकात येऊ शकल्या नाहीत.

सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत स्वतंत्र महसूल मंडल असलेल्या जालना शहरात सरासरी ७६.६ मिमी पाऊस झाला. यापैकी बहुतेक पाऊस मध्यरात्रीनंतर झाला. जालना तालुक्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. सेवली (१११.८ मिमी), रामनगर (७६.८) आणि पाचनवडगाव (७६ मिमी) याप्रमाणे अतिवृष्टीची नोंद झाली.

अंबड तालुक्यातील जामखेड (६८.३), रोहिलागड (६५.३३) आणि सुखापुरी (६७ मिमी) याप्रमाणे महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. तर बदनापूर तालुक्यातील बदनापूर, सेलगाव आणि रोषणगाव या महसूल मंडलांत ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी झाली. चालू पावसाळ्यात जालना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७३३ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या अपेक्षित वार्षिक सरासरीच्या (६०३ मिमी) तुलनेत या पावसाळ्यात आतापर्यंतचा पाऊस १२१ टक्के आहे.

अतिवृष्टीमुळे जालना शहरातील अनेक भाग जलमय झाले. जालना तालुक्यातील उखळी गावाजवळचा पाझर तलाव अतिवृष्टीमुळे फुटला. कुंडलिका नदीच्या पुलावरील पाणीपातळी वाढल्याने जालना शहरातील बसस्थानकाजवळील रस्ता सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अंबड तालुक्यातील मठ जळगाव तांडा येथील पाझर तलाव अतिवृष्टीमुळे फुटला. घनसावंगी तालुक्यातील मंगू जळगाव येथील पाझर तलाव मध्यरात्री फुटला, तर मुद्रेगाव आणि रामगव्हाण दरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्याने मुद्रेगावचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील ७ पैकी जिवरेखा, ऊर्ध्व दूधना, गल्हाटी, कल्याण गिरिजा आणि जुई है पाच मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरून वाहत आहेत. तर, जिल्ह्यातील ५८ लघुसिंचन प्रकल्पांपैकी ४१ प्रकल्प भरून वाहत आहेत. जिल्ह्याच्या सीमेवरील निम्न दूधना प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा झालेला आहे.

पुरात अडकलेले १४ नागरिक सुरक्षितस्थळी

तालुक्यातील विरेगाव येथील १४ नागरिक पुरात अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सेवली मंडळातील उखळी येथील पाझर तलाव अतिवृष्टीने फुटल्याने याठिकाणच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील विरेगाव, सेवली, नेरसह बाधित गावांची सोमवारी आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. संबधितांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांशी संवाद साधुन शासन प्रशासन आपणांस सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार छाया पवार आदींची उपस्थिती होती.