पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडला. या पावसाने दोन तालुक्यांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या; तर मका, ज्वारी, डाळिंब या पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने विशेष बाब म्हणून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी सांगोल्याचे आमदार बाबसाहेब देशमुख यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. पुढे पहाटे तीन वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. तालुक्यातील कडलास, अकोला, लोणविरे, सोनंद, हतीद, वाटबरे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या पावसाने ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. सखल भागात पाणी साचल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील दोन मंडलांत ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. घरांची पडझड झाली. तसेच संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने संसार उघड्यावर आले आहे. रात्री अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. तसेच अनेक शेतांत गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. मका, बाजरी, तूर, डाळिंब आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाच्या पाण्यात पिके वाहून गेली आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. याबाबत पालकमंत्री, मुख्यमंत्री यांना माहिती दिली. सरकारने विशेष बाब म्हणून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली. तसेच माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत करावी, अशी मागणी माजी आमदार त्यांनी केली. असे असले, तरी दुष्काळी सांगोला तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली; मात्र अनेकांचे नुकसान करून पाऊस पडला, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
पंढरपुरात मुसळधार
पंढरपूर शहरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारी चांगले ऊन पडले होते. सायंकाळी ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. या पावसाने नागरिकांसह भाविकांची तारांबळ उडाली.