सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, आणि वैभववाडी तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. या जोरदार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक सखल भागांत पाणी साचले आहे.
सावंतवाडी-आंबोली मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.आंबोली ते सावंतवाडी मार्गावरील माडखोल धवडकी नदीला पूर आल्याने रस्ता पाण्याखाली गेला होता, ज्यामुळे आंतरराज्य वाहतूक काही काळ थांबवण्यात आली.
बांदा शहरात पूरसदृश स्थिती: मुसळधार पावसामुळे बांदा शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आळवाडी-कट्टा कॉर्नर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती ,ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
तेरेखोल नदीची पाणी पातळी धोक्याच्या वर: सततच्या पावसामुळे तेरेखोल नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे आणि पाणी पात्राबाहेर येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यानुसार पावसाची आकडेवारी:
२८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८९.३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस दोडामार्ग (१७२ मिमी), सावंतवाडी (१४० मिमी), आणि वैभववाडी (१११ मिमी) या तालुक्यांमध्ये झाला आहे. उर्वरित तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. तेथे देवगड २० मी मी,मालवण ४८ मी मी,वेंगुर्ला ७९ मी मी , कणकवली ३६ मी मी,कुडाळ १०९ मी मी एवढी पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर पाऊस कोसळत आहे तर सकाळी देखील काही परिसरात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे श्री गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.