सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर पकडला असून, जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. ३ जुलै रोजी ऑरेंज तर दि.४,५ व ६ जुलै रोजी येलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ४०.५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते, त्यानंतर अधूनमधून पाऊस पडत होता. आता मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तिलारी धरणातून विसर्ग सुरू, पाणी पातळी वाढली
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाची पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. आज, २ जुलै रोजी दुपारी २.५० वाजता तिलारी मुख्य धरणाचा सांडवा प्रवाहित झाला आहे. तिलारी धरणाची पाणी पातळी सध्या १०६.७० मीटर (सांडवा माथा पातळी १०६.७० मी., पूर्ण जलसंचय पातळी ११३.२० मी.) इतकी आहे. तिलारी नदीतील पाणी पातळी ३८.३० मीटर इतकी असून, नदीची इशारा पातळी ४१.६० मीटर आणि धोका पातळी ४३.६० मीटर आहे.
तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे सांडव्यातील विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होऊन तिलारी नदीची पाणी पातळी आणखी वाढू शकते, अशी माहिती सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चराठे येथील कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी दिली.
नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
यापूर्वीच नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याबाबत उपविभागामार्फत सूचित करण्यात आले असून, सायरन वाजवून इशाराही देण्यात आला आहे. जिल्हा व तालुका प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्याशी सांडव्यावरील विसर्ग, नदी पातळी आणि धरण पाणी पातळी याबाबत सकाळी व सायंकाळी माहिती अद्ययावत करून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना नदीपात्रात न उतरण्याचे आणि योग्य ती सावधानता व खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रातून ये-जा करणे टाळावे. तसेच, नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला आणि गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीपात्रात सोडणाऱ्या शेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गावपातळीवरून याबाबत दवंडी देऊन जलसंपदा विभागास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.