सांगली : जत, आटपाडी व कवठेमहांकाळ वगळता पंधरा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात रात्रीपासून दमदार पावसाचे पुनरागमन झाले. शिराळा तालुक्यातील चरण मंडळात ६५.३ मिलीमीटर पाऊस गेल्या २४ तासांत नोंदवला गेला. कोयना धरणातून मंगळवारपासून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. गेले पंधरा दिवस पावसाची एखादी सर येत होती, मात्र, त्याचा खरीप पिकांना फारसा उपयोग होत नव्हता.

सोमवारी रात्रीपासून दमदार पाऊस जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू झाला. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी रात्रभर पावसाची संततधार सुरू असल्याने पश्चिम भागात ओढे-नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले आहेत. चांदोली धरणात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पाणीसाठा २८.०७ टीएमसी झाला होता. धरण क्षमतेच्या ८२ टक्के हा साठा असून धरणाच्या सांडव्यातून २ हजार ८७० आणि पायथा विद्युतगृहातून १ हजार ६३० असा साडेचार हजार क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५३ मिलीमीटर पाऊस झाला.

कोयना धरणातील जलसाठा ७५.४८ टीएमसी म्हणजेच ७२ टक्के झाला असून मंगळवारपासून धरणाच्या वक्र दरवाजातून ५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. तसेच विद्युतगृहातून २ हजार १०० क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील पाणी पातळी वाढणार आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

चांदोली धरणातून वारणा नदीत साडेचार हजार आणि कोयनेतून ७ हजार १०० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याने दोन्ही नदीकाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोयना धरणातून विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीतील पाणी पातळी बुधवारी सकाळपर्यंत तीन ते चार फूट वाढण्याची शक्यता असून मंगळवारी सकाळी आयर्विन पुलाजवळ नदीतील पाणी पातळी १३ फूट होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.५ मिलीमीटर पाऊस झाला असल्याचे पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात ४६.२ मिलीमीटर नोंदला गेला असून दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जतमध्ये १.२, आटपाडीमध्ये ४.५ मिलीमीटर पाऊस झाला. शिराळा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, तासगाव, मिरज आदी तालुक्यांत मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला.