कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. पावसाचा वेग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिरोळ तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काही मार्गांवर वाहतुकीत व्यत्यय आला आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग अधिक आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी काल २४ फूट ५ इंच होती. ती आज २५ फूट ११ इंच इतकी झाली होती. रुई, इचलकरंजी येथे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आणखी दोन बंधारे पाण्याखाली गेले असून, एकूण १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

शिरोळमध्ये वाहतूक विस्कळीत

शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील तेरवाड, शिरोळ, कृष्णा नदीवरील कनवाड-म्हैसाळ, राजापूर तसेच दूधगंगा नदीवरील दत्तवाड, मलिकवाड आणि दत्तवाड-एकसंबा हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यांद्वारे महाराष्ट्र-कर्नाटक दरम्यानचा वाहतूक खंडित झाली आहे. राजापूर-जुगुळ (कर्नाटक) आणि कुरुंदवाड-शिरोळ या बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणातील साठ्यात वाढ

राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सेवाद्वारातून विसर्ग वाढवून १५०० क्युसेस तर विद्युतगृहातून १६०० असा एकंदरीत ३१०० क्युसेस करण्यात आला आहे. आजरा तालुक्यातील धनगरवाडी लघु प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून व सेवाद्वारमधून विसर्ग सुरू झाला आहे. तो वाढण्याची शक्यता असल्याने हिरण्यकेशी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.