सांगली : शुक्रवारी दुपारपासून सुरू असलेली पावसाची संततधार सांगली जिल्ह्यात कायम असून ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्ता वाहतूक ठप्प झाली आहे. कोयना, चांदोली धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आज महापालिका क्षेत्रातील शाळांना सुटी देण्यात आली. तर शहरातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असा इशारा महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या पावसाने रात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यातील ६८ पैकी सांगली, मिरज शहरासह २१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत झाली. हिगणगाव (ता. कवठेमहांकाळ) आणि बेळंकी (ता. मिरज) येथे ९०.८ मिलीमीटर पाऊस रात्रीत झाला आहे. तर तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, येळावी, सावळज, मणेराजुरी, वायफळे, कवठेमहांकाळसह तालुक्यातील कुची, ढालगाव, देशिंग, हिंगणगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

गेल्या ३० तासांपासून सुरू असलेल्या पावसाने ग्रामीण भागातील अनेक जिल्हा मार्ग ओढ्यांना आलेल्या पुरामुळे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. यामध्ये तासगाव ते मिरज, तासगाव ते आटपाडी भिवघाटमार्गे, हिंगणगाव ते कवठेमहांकाळ हे वर्दळीचे रस्ते बंद झाले आहेत. मणेराजुरी पुलावर पाणी आल्याने तासगाव ते कवठेमहांकाळ हा राष्ट्रीय महामार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आला, राजापूर- शिरगाव, लोंढे- कौलगे, गव्हाण-मणेराजुरी हे मार्ग पुलावर पाणी आल्याने बंद करण्यात आले आहेत. विटा-पारे, बलवडी खालसा ते खरसुंडी, मोही ते खानापूर, गोरेवाडी ते बलवडी हे खानापूर तालुक्यातील रस्ते पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

सांगली महापालिका क्षेत्रात कालपासून जोरदार पाऊस सुरू असून संततधार पावसाने रस्त्यावर फूट, दोन फुटांनी पाणी वाहत आहे. विस्तारित भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना आज सकाळपासून घरातून बाहेर पडता आलेले नाही. मुख्य रस्त्यावरही पाण्यामुळे वाहनांची वर्दळ रोडावली असून अत्यावश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. आनंदनगर येथील नाला तुंबल्याने अनेक नागरिक अडकले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पावसात नाला सफाई करून मार्ग खुला केला. तर विश्रामबाग परिसरात झाड पडल्याने धामणी मार्गावरील वाहतूक बंद झाली. झाड पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. यामुळे वीज प्रवाह खंडित झाला आहे. तर गावभागातील जैन मंदिराजवळील जुनी इमारत पावसाने कोसळली. महापालिकेने तत्काळ राडारोडा जेसीबीच्या मदतीने बाजूला केला. सुदैवाने या इमारतीमध्ये वास्तव्यास कोणी नसल्याने कोणाला इजा झाली नाही.

दरम्यान, कोयना धरणातून दुपारी दोन वाजल्यापासून सहा वक्र दरवाजांतून १८ हजार ७६४ आणि पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच चांदोली धरणातून दुपारी सव्वा वाजल्यापासून वक्र दरवाजाद्वारे ३ हजार ४७९ आणि पायथा विद्युतगृहातून १६३० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा जलसंपदा विभागाकडून शनिवारी देण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुकानिहाय झालेला पाऊस असा, मिरज ६८.१, जत ४४.१, खानापूर ५९.३, इस्लामपूर २७.८, तासगाव ६९.९, शिराळा २०.८, आटपाडी ५३.४, कवठेमहांकाळ ८३.६, पलूस ४७.६ आणि कडेगाव ४०.९ मिलीमीटर.