अकोले : तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील हरिश्चंद्रगड, रतनगड, सांदणदरी या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अलंग, मदन, कुलंग या किल्ल्यांवरही पर्यटकांना जाता येणार नाही. वन्यजीव विभागाने हा आदेश जारी केला आहे. ही प्रवेशबंदी २० ऑगस्टपर्यंत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील पश्चिम भागात कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या पर्वतरांगांमध्ये अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात या परिसरातील निसर्ग अधिकच खुलतो. धबधबे कोसळू लागतात. ओढे-नाले खळाळतात. येथील निसर्ग अनुभवण्यासाठी, पावसात भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील हरिश्चंद्रगड हा दुर्गप्रेमींचे भटकंतीचे आवडते ठिकाण. निसर्गप्रेमी पर्यटकांचा या गडावर वर्षभर राबता असतो. अलीकडे पावसाळ्यात साहसी पर्यटकांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात तीन-साडेतीन महिने येथे मुसळधार पाऊस पडतो. पावसाबरोबर वातावरणात गारठाही असतो. हा गड ढग आणि धुक्यात हरवून जातो. त्यामुळे माहीतगार व्यक्ती सोबत असल्याशिवाय गडावर जाणे धोक्याचे असते. गतवर्षी दाट धुक्यामुळे पर्यटकांचा एक गट वाट चुकला. पावसातच त्यांना रात्र काढावी लागली. त्यात गारठून एका पर्यटकाचा मृत्यू झाला.
डोंगर, जंगलातील वाटा निसरड्या होतात. रस्त्यातील ओढ्यांना पूर येणे, दरड कोसळणे यामुळेही पर्यटकांच्या जिवाला धोका असतो. गडावर काही अपघात घडल्यास मदत पोचविणेही कठीण असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वन्यजीव विभागाने हरिश्चंद्रगडावर पर्यटकांसाठी प्रवेशबंदी लागू केली आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील साम्रद गावाजवळ असणारी सांदणदरी निसर्गाचा अनोखा आविष्कार आहे. या परिसरात कोसळणारा धो धो पाऊस, दरीतून वाहणारे पावसाचे पाणी, दिवसभर पडणारे दाट धुके यामुळे दरीत उतरणे धोकादायक असते. वाटा निसरड्या झाल्यामुळे अपघाताची शक्यता असते. सुरक्षिततेसाठी सांदणदरी येथेही पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातच रतनगड आहे. प्रवरा नदी या गडावर उगम पावते. दरड कोसळण्याची शक्यता, ओढ्या-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणे, अतिवृष्टीमुळे गडावरील त्र्यंबक दरवाजाची कमान भिंत कोसळण्याची शक्यता, यामुळे हा गडही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. अलंग, मदन, कुलंग या चढाईसाठी अवघड दुर्ग त्रयींवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.