नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने २४ महसुली मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बिलोली तालुक्यात एक ट्रक व किनवट तालुक्यात दोन नीलगायी वाहून गेल्याच्या दुर्घटनेची नोंद झाली. आसना, गोदावरी, पैनगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. वेगवेगळ्या भागांतील नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे जोरदार बरसणे सुरू आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या पावसाने रविवारी काही भागांत विश्रांती घेतली असली तरीही नदीपात्रात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने पूर परिस्थिती कायम आहे. गेल्या २४ तासांत नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी, लिंबगाव, तरोडा, हदगाव तालुक्यातील तळणी, निवघा, पिंपरखेड, आष्टी, भोकर तालुक्यातील मातूळ, किनी, किनवट तालुक्यातील बोधडी, इस्लापूर, जलधरा, शिवणी, मांडवी, शिंदगी, मुखेड तालुक्यात तसेच हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर, सरसम, माहूर तालुक्यातील वानोळा, अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, दाभड व मालेगाव या २४ महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात आणखी तीन दिवसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संततधार पावसामुळे तेलंगणा, नांदेड व विदर्भाला जोडणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहेत. याच पुरात दोन नीलगायी वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. बिलोली तालुक्यातल्या शहापूर, खतगाव या मार्गावरील एका पुलावरून मुरूम घेऊन जाणारा ट्रक वाहून गेला. सुदैवाने यातला चालक मात्र बालंबाल बचावला.

नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. शिवाय गोदावरी नदीवरील मुदगल, दिग्रस, अंतेश्वर, आमदुरा, बळेगाव, बाभळी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. गोदावरी नदीच्या पात्रात येणाऱ्या येलदरी, सिद्धेश्वर, लोअर दुधना या प्रकल्पाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी पूर्ण दुथडी भरून वाहत आहे. इसापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. पैनगंगा नदीच्या पुरामुळे हदगाव, किनवट, माहूर, मांडवी या तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. कयाधू नदीला पूर आल्याने हदगाव तालुक्यातील मानवाडी, निवघा बाजार, धानोरा, उंचेगाव, गोजेगाव, कोथळा, बैलगव्हाण, वाकोडा, गुरफळी, बाभळी. हरडप यांसह अनेक गावांतल्या शेतात पाणी शिरल्याने सोयाबीन, कापूस, हळद, केळी, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

किनवट शहर व परिसरात अनेक घरांत पाणी शिरल्याने सुमारे दोनशे कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. किनवट नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अजय कुरवाडे यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संतापलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. हिमायतनगर तालुक्यातल्या गोजेगाव पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हदगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे सोपस्कार न करता सरसकट मदत मिळावी. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने हतबल झाला आहे. राज्य शासनाने याची दखल घ्यावी. – पंजाबराव शिंदे, माजी सरपंच उंचेगाव