सांगली : जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी वीजेच्या कडकडाटासह झालेल्या वळीव पावसाने ओढ्या-नाल्यांना हंगामात पहिल्यांदाच पाणी वाहते झाले. तर पाण्याच्या दबावाने ताली फुटण्याचे प्रकारही घडले. सांगली मिरज शहरात सुमारे एक तास पावसाने हजेरी लावल्याने सखल भागात पाणी साचल्याने वाहन धारकांची त्रेधा उडाली होती.
दुपारी चार वाजलेपासून जत, कवठेमहांकाळ तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली. मिरज पूर्व भागातील आरग, बेडग, एरंडोली, खंडेराजुरी, मालगाव परिसरातही अगोदर हलका पाउस झाला. मात्र, त्यानंतर पुन्हा जोरदार पाउस झाल्याने परिसरात पाणीच पाणी झाले. तासगाव तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. पलूस, कडेगाव,विटा परिसरात हलका पाउस आज झाला असला तरी गेल्या दोन दिवसापुर्वी दमदार पाउस झाल्याने राने चांगली भिजली आहेत. आज दिवसभर सुर्यदर्शन अल्प प्रमाणात झाले. दिवसभर ढगाळ हवामान होते.
गेले तीन दिवस कमी अधिक प्रमाणात जिल्ह्याच्या विविध भागात वळीव पाउस हजेरी लावत आहे. रोहिणी नक्षत्र २५ मेपासून सुरू होणार असताना तत्पुर्वीच वळीव पावसाची जोरदार सुरूवात झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असला तरी उन्हाळी हंगामातील पेरणीपूर्व मशागतीचे कामे सलग पडणार्या पावसाने खोळंबली आहेत. तर शिराळा, वाळवा तालुक्यात सोयाबीन, भात पेरणीची कामे खोळंबली आहेत. मोकळ्या वावरात पाणी साचल्याने पेरणीसाठी कुरी चालत नसल्याने पेरण्या थबकल्या आहेत, तर हळदीची लागणही वरूंब्यात पाणी साचल्याने थांबली आहे.
मागील हंगामातील रब्बीची पिके काढणीनंतर अनेक शेतकर्यांनी नांगरटीची कामे मार्च महिन्यातच उरकली असून नांगरटीच्या रानात ढेकळे फुटून जलमय झाले आहे. तालीच्या रानात पाणी गोळा होउन सोमवारी अनेक ताली फुटल्याने नाले दुथडी भरून वाहू लागले असून गावओढ्यांना यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पाणी वाहते झाले आहे.
सलग पावसाची हजेरी असल्याने हवेतील उष्णताही कमी झाली असून वैशाख वणवा यंदा सुसह्य झाला आहे. मंगळवारी सांगलीतील किमान तपमान २४ तर कमाल तपमान ३२ सेल्सियस होते, तर सायंकाळी वार्याचा वेग ताशी १५.६ किलोमीटर प्रतितास होता. हवेतील आर्द्रता ७१ टक्के होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवेतील तपमान ४० अंशापर्यंत वाढले होते. मात्र, वळीव पावसाने हवेतील उष्णता कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.