परभणी : रक्ताचा आनुवंशिक आजार ‘हीमोफिलिया’वरील हेमलिब्रा इंजेक्शन उपलब्ध परभणी जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात हीमोफिलियाचे ४८ रुग्ण असून, माता ही या आजाराची वाहक आहे. त्यामुळे आता हीमोफिलिया आजाराशी संबंधित उपचारासाठी जिल्ह्याबाहेर किंवा मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज उरली नाही.
हेमलिब्रा या इंजेक्शनचे लोकार्पण येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, ‘शासकीय वैद्यकीय’चे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. सारिका बडे, हीमोग्लोबिनो पॅथीचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची उपस्थिती होती.
काय आहे हीमोफिलिया आजार
हीमोफिलिया हा रक्ताचा आनुवंशिक आजार असून, माता ही या आजाराची वाहक आहे. मात्र, मातेला या आजाराचा कसलाही त्रास होत नाही. पुरुष अपत्यास मातेकडून हा आजार आल्यास अशा बालकास होणाऱ्या जखमेचा रक्तस्राव थांबत नाही. रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकाची कमतरता असल्यामुळे रक्तस्राव झाल्यास त्यांना रक्त थांबविण्यासाठी औषधे द्यावी लागतात.