दिगंबर शिंदे, सांगली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकशाही शासन व्यवस्था असताना ८० घराणीच सत्तेच्या परिघात असल्याने बहुजन समाज आजही सत्तेबाहेरच्या परिघात राहिला हे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविलेले निरीक्षण बरेच बोलके आहे. राजकारणातील घराणेशाही पुन्हा एकदा चच्रेत आली असली तरी यामध्ये बदलाची शक्यता दुरापास्त आहे. कारण सत्तेच्या परिघात राहिलेल्या या मंडळींना बदल नको तर आहेच, पण सामान्य लोकांनाही हे अंगवळणी पडले असल्याने वळचणीचं पाणी वळचणीलाच जाण्याची साधार भीती वाटते.

सांगली जिल्ह्य़ाचा विचार केला तर वसंतदादा, राजारामबापू या दोन पाटील घराण्यातील दुसरी पिढी राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहेच, पण आता तिसरी पिढीही राजकारणाच्या उंबरठय़ावर आली आहे. काही माणसं मूळचीच कर्तृत्ववान असतात, अशा माणसाकडे नेतृत्वाचे गुण अंगभूतच असतात, यापैकी दादा, बापू यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील.

दादा घराण्यात स्व. विष्णुअण्णा पाटील यांच्याकडे कारखान्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सहकार अण्णांच्याकडे आणि लोकप्रतिनिधित्व प्रकाशबापू यांच्याकडे अशी विभागणीही करण्यात आली होती. मात्र कालपरत्वे लाल दिव्याचा मोह नडल्याने दादा घराण्यातच भाऊबंदकी सुरू झाली. अण्णा-बापू यांच्या पश्चात ही भाऊबंदकी संपण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. मदन पाटील यांच्या पश्चात ही भाऊबंदकी काही अंशी कमी झाली असली तरी ती तेवत ठेवण्याचे मनसुबे आजही काही मंडळींच्या डोक्यात आहेत, वसंतदादा यांच्या नंतर प्रकाशबापू, बापूंच्यानंतर प्रतीक आणि विशाल अशी हा वारसा कायम राहिला आहे.

राजारामबापू पाटील हे मूळचे वाळवा तालुक्यातील कासेगावचे त्यांच्या पश्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे या घराण्याचा राजकीय वारसा जोपासत असताना बापूंचे दुसरे चिरंजीव भगतसिंग हे मात्र राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. तथापि, तिसऱ्या पिढीतील प्रतीक आणि राजवर्धन हे जयंतपुत्र गणेशोत्सव, क्रीडा स्पर्धा, गावोगावच्या कुस्त्यांची मदाने या निमित्ताने सार्वजनिक जीवनात कार्यरत झाले आहेत. या दोघांच्या रूपाने राजारामबापूंच्या घराण्यातील तिसरी पिढी सत्तेच्या वर्तुळात आली तर नवल वाटणार नाही.

याच पद्धतीने सोनसळचे कदम घराणे, डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षणक्षेत्रात कार्य केले. त्यांचे बंधू मोहनराव कदम यांच्याकडे सोनहिरा कारखान्याची धुरा असतानाही विधान परिषदेसाठी दुसरे कोण कार्यकत्रे त्यांना मिळाले नाहीत. समाजानेही कदम साहेबांच्या पश्चात आमदारकीसाठी विश्वजित कदम यांच्याकडेच नेतृत्व सोपविले.

भाजपमध्येही तेच..

’ घराणेशाही हा केवळ काँग्रेस अथवा राष्ट्रवादी या दोन पक्षांचाच हक्क आहे असे नाही, तर गेल्या चार-पाच वर्षांत चच्रेत आलेला भाजपही याला अपवाद नाही. पक्षाशी आणि पक्षाच्या विचारधारेसाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्यांनी सभा, संमेलनासाठी गर्दी करायची, टाळ्या वाजवायचा आणि नव्याने आलेल्यांनी व्यासपीठावर जागा पटकावायची ही प्रथाच आहे. प्रस्थापित असलेल्यांनाच संधी ही यशस्वीततेची पहिली पायरी मानली आहे. यातूनच कडेपूरच्या देशमुख घराण्याला अगदी जिल्हाध्यक्षपदापासून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात भाजपने धन्यता मानली.  यामुळे पार्टी वुईथ डिफरन्सचा भाजपने कितीही डांगोरा पिटला तरी मूळ आहे ते मातबर घराण्यातील राजकीय संस्थांनीच आज सत्तेच्या वर्तुळात महत्त्वाची ठरत आहेत.

’ या तुलनेत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांचे नाव सामान्य म्हणून घेता येईल. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी तासगावमध्ये आपले राजकीय महत्त्व प्रस्थापित करीत असताना राज्याच्या नेतृत्वातही आपले वेगळेपण जोपासले. तरीही दर विधानसभा निवडणुकीत त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न प्रस्थापित मंडळीकडूनच झाली. आबांच्या पश्चात पत्नी सुमनताई पाटील या वारसदार म्हणून पुढे आल्या असल्या तरी आ. जयंत पाटील यांनी याच घरातील आबांचे पुत्र रोहित पाटील हे भविष्यात आबांचे वारसदार असतील असे जाहीरपणे सांगितले आहे. म्हणजे या पलीकडे कोणाचे नेतृत्वच असू शकत नाही हे िबबविण्याचाच हा एक प्रयत्न म्हणावा लागेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hereditary politics patil family third generation in politics
First published on: 10-01-2019 at 02:24 IST