सावंतवाडी : सावंतवाडी – सालईवाडा येथे हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थीचा सण साजरा करत एकतेचे सुंदर उदाहरण पेश केले आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून, या दोन्ही समाजातील तरुणांनी एकत्र येत सलोख्याचा संदेश दिला आहे.
१७ दिवस चालणारा उत्सव:
सालईवाडा भट्टीवाडा युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने १७ दिवस गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. आज संकष्टी चतुर्थी असल्याने बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाचे एक भक्त संजय वेंगुर्लेकर यांचा मुलगा ऋषी वेंगुर्लेकर दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांनी बाप्पाला एक हजार १११ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला.
एकजुटीचा संदेश:
या मंडळाच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला जात आहे. १७ दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्व धार्मिक विधी यथासांग पार पाडले जातात. १७ दिवसांनंतर वाजतगाजत मिरवणुकीने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. हा उपक्रम समाजातील ऐक्य आणि सलोखा टिकवून ठेवण्याचा एक उत्तम प्रयत्न आहे.