हिंगोली : नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. तत्पूर्वीच काहींकडून व्यापाऱ्यांच्या घरी जावून चौकशा लावू म्हणत धमकावले जात आहे. परंतु, व्यापाऱ्यांनी चिंता करू नये. भाजपचे सरकार त्यांच्या पाठीशी आहे. हिंगोलीतील व्यापाऱ्यांनी सांगावे की, भाजपच्या एकाही कार्यकर्त्याने त्यांना धमकावले का ? माझा एकही कार्यकर्ता वाळू, गुटखा विकत नाही, मटका घेत नाही. कुणाच्याही भूखंडावर ताबा घेत नाही. इमानदार कार्यकर्त्यांची फौज भाजपकडे आहे, असे सांगत या पक्षाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेला अप्रत्यक्षपणे डिवचले.

कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन करत आमदार मुटकुळे यांनी, आम्हालाही इट का जवाब पत्थर से देता येतो, अशा आक्रमक शब्दात शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली.

हिंगोलीत आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या विधानसभेतील कार्यकाळात ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुटकुळे बोलत होते.

कार्यक्रमास परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार मुटकुळे यांच्या कामांची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. हा कार्यक्रम आमदार मुटकुळे यांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचा असला तरी यामध्ये भाजपने हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे स्पष्ट झाले.

खासदार चव्हाण, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा पाढा वाचला. परंतु, आमदार मुटकुळे यांनी मात्र आक्रमक भाषण करत शिंदे सेनेच्या स्थानिक नेतृत्वाला डिवचल्याचे दिसून आले. जिल्ह्यात नगरपालिकांची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतील, अशी चर्चा सुरू असून, या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.