Yogesh kadam On Nilesh Ghaywal and Sachin Ghaiwal : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. निलेश घायवळने परदेशात पलायन केलं असून त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. यातच आता निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या आरोपानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट शेअर करत या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पडताळणीनंतर शस्त्र परवाना देण्यात आल्याचं स्पष्टीकरण मंत्री योगेश कदम यांनी दिलं आहे. तसेच सुनावणीच्या दिवशीपर्यंत सचिन घायवळच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, असंही योगेश कदम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

योगेश कदम काय म्हणाले?

“शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे, म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे”, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सचिन घायवळ याला पोलिसांच्या विरोधानंतर देखील शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून यावर योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देत सदर प्रकरणात नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी काय म्हटलं?

“कोणालाही शस्त्र परवाना देताना त्यामध्ये कोणत्याही मंत्र्यांचा हस्तक्षेप नसतो. मूळात शस्त्र परवाना हे संबंधित आयुक्त असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल हे लोकं शस्त्र परवाना देत असतात. आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक लोकांची शिफारस आम्ही करतो. मात्र, त्याच्या संपूर्ण बाजू तपासणं तेथील आयुक्तांचं काम असतं. तसेच त्या शस्त्रपरवान्यावर तेथील आयुक्तांची सही असते”, असं मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.