प्रदीप नणंदकर

लातूर : दर्जेदार अभियांत्रिकीच्या शिक्षणास प्रवेश मिळविण्यासाठी घेतलेल्या संयुक्त पात्रता परीक्षा, आयआयटी आणि एनआयटी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेले परंतु बारावी परीक्षेत मात्र निकषाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात दोन हजारांहून अधिक आहेत. या विद्यार्थ्यांच्या श्रेणीसुधार परीक्षा ऑगस्टमध्ये होणार असून, तत्पूर्वीच आयआयटी व एनआयटीचे प्रवेश बंद होत असल्याने अशा विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

कोविडच्या काळात आयआयटी, एनआयटी व तत्सम महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बारावीच्या गुणांची ७५ टक्क्यांची अट शिथिल करण्यात आली होती. या वर्षी ती पुन्हा लागू करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी बारावीची परीक्षा दिलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा दिली. त्यात त्यांना प्रवेशाला लागणारे गुण मिळालेले आहेत. मात्र, बारावीची परीक्षा पूर्वी दिलेले व त्यात ७५ टक्के गुण नसल्यामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. या वर्षी बारावीची परीक्षा देऊन जेईईची परीक्षा देणारेही शेकडो विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी श्रेणीसुधार परीक्षा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने १० ते १८ ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. त्यानंतर या परीक्षेचा निकाल लागेल. मात्र आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी ६ ऑगस्ट ही शेवटची तारीख असेल. त्यापूर्वी श्रेणीसुधार परीक्षा होत नसल्यामुळे राज्यातील शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.

गतवर्षी बारावीची परीक्षा दिलेले शेकडो विद्यार्थी आहेत. या वर्षी त्यांनी केवळ जेईईची तयारी करून परीक्षा दिली आहे. ज्यात आयआयटी, एनआयटी प्रवेशास ते पात्र आहेत; मात्र बारावीला कमी गुण असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तातडीची परीक्षा घेण्याची योजना केली, तर शेकडो विद्यार्थी आयआयटी, एनआयटी प्रवेशास पात्र ठरतील.-सचिन बांगड, समुपदेशक, अॅडमिशन मेक इझी, लातूर</strong>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील एनआयटी, आयआयटी प्रवेशास पात्र होण्यासाठीचे गुण घेतलेले शेकडो विद्यार्थी आहेत. त्यांची ६ ऑगस्टपूर्वीच महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने तातडीची परीक्षा घेतली व निकाल लावून प्रवेशाची संधी दिली, तर राज्यातील शेकडो विद्यार्थी एनआयटी व आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरतील. –योगेश गुट्टे, ,समुपदेशक, व्हीजन करिअर कौन्सिलिंग सेंटर, लातूर