scorecardresearch

‘मी भाजपाचा आमदार पण…’ शिवेंद्रसिंहराजेंनी केलं अजित पवारांचं कौतुक

भाजपा नेते आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे

(File Photo)

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपा दोघांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. असं असताना भाजपा नेते आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मात्र राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. “मी भाजपचा आमदार असलो तरी काळजी करू नका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला मतदार संघातील जावळी तालुक्याच्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मी भाजपाचा आमदार असलो तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मला नेहमीच विकासकामांसाठी मोठं सहकार्य मिळतं”, अशा शब्दांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे. ते जावळी तालुक्यातील सरताळे येथे बोलत होते.

त्यांनी पुढे म्हटलं की, विकासकामांत राजकारण आजपर्यंत कधीही आडवं आलेलं नाही. जावळी तालुक्याच्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी अजित पवारांनी दिला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजपामध्ये आहेत. तालुक्याचा विकास होणार नाही, असे सांगून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या विरोधकांना ही एक प्रकारे चांगली चपराक आहे, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव न घेता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.

सरताळे (ता. जावळी) येथे विकास सेवा सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, किसन वीर कारखान्याचे संचालक हिंदुराव तरडे, जयदीप शिंदे, समीर आतार, बंडा पवार, सुनील भिसे, दस्तगीर शेख यांच्यासह ग्रामस्थ व संचालक उपस्थित होते.

मी दौऱ्यात नव्हतो, तरीही त्यांनी माझ्या कामांबाबत कौतुक केलं. हे माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे. मुंबईवरून येऊन इथं दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता उत्तर देईल. त्यामुळे अशा प्रवृत्तीकडे लक्ष देऊ नका, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना नाव न घेता लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I am mla of bjp but ajit pawar always help for development projet bjp mla shivendrasinh raje praised ajit pawar rmm