Rajesaheb Deshmukh Viral Video : विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याकरता अनेक पक्षांनी अन् उमेदवारांनी फार विविध आश्वासनं दिली. लाडकी बहीण योजनेसारख्या आश्वासनांसहित निवडून आल्यास मुलांची लग्ने लावून देण्यापर्यंतची अनेक आश्वासनाची गाजरे या निवडणुकीत दाखवण्यात आलीत. परळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या धनंजय मुंडे यांच्याविरोधात उभे ठाकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राजसाहेब देशमुख यांनीही असंच हास्यास्पद आश्वासन दिलं होतं. त्यामुळे ते जिंकून आलेत की नाही? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना महायुतीने उमेदवारी दिली होती. तर, धनंजय मुंडे यांच्यासमोर शरद पवारांनी मराठा उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरवलं. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरील राजेसाहेब देशमुख यांना पवारांनी पक्षात घेऊन धनंजय मुंडेंसमोर उतरवले. देशमुख हे ‘बाहेरचे’ म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील असले तरी ते ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत, तो परळी विधानसभा क्षेत्रात येणारा आणि ६० गावांचा मराठा बहुलपट्टा असल्याने लोकसभेप्रमाणे परळीमध्ये पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली.

दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी प्रचारांचा धडाका उडवला होता. धनंजय मुंडे यांच्यासाठी त्यांची बहिण पंकजा मुंडे प्रचाराच्या मैदानात उतरल्या. तर, दुसरीकडे राजेसाहेब देशमुख यांच्याकडून मतदारसंघ पिंजून काढण्यात येत होता. एका ठिकाणी झालेल्या प्रचारसभेत तर त्यांनी तरुण मतदारांसाठी खास आवाहन केलं. ते म्हणाले, “परळीतील तरुण पोरांना लग्नासाठी आधी नोकरी आहे का विचारतात. सरकारच देत नाही नोकरी तर लग्ने कशी लागणार? काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळे सर्व पोरांचं लग्न होणं अवघड झालं आहे. त्यामुळे सर्व पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ, सगळ्या पोरांना कामधंदा देऊ.”

View this post on Instagram

A post shared by Rajesaheb Deshmukh (@rajesaheb_deshmukh)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेसाहेब देशमुख यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव

त्यांचे हे वाक्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. अनेक तरुणांनी ही व्हिडिओ क्लिप व्हायरल केली होती. त्यामुळे ते उमेदवार विजयी झालेत की नाही, याची चर्चाही आता सोशल मीडियावर रंगली आहे. परंतु, त्यांचा पराभव झाला आहे. धनंजय मुंडे हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. धनंजय मुंडे यांना १ लाख ९४ हजार ८८९ मते मिळाली असून राजेसाहेब यांना ५४ हजार ६६५ मते मिळाली आहेत. म्हणजेच धनंजय मुंडे यांनी त्यांचा १ लाख ४० हजार २२४ मतांनी पराभव केला आहे.