अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक संघर्ष रंगला आहे. काही दिवसांपूर्वी जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनीदेखील जलील यांना थेट आव्हान दिलं. हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा. मला पराभूत करून दाखवा, असं आव्हान राणा यांनी जलील यांना दिलं आहे. या आव्हानावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील म्हणाले, मला तुम्ही बोगस जातप्रमाणपत्र मिळवून द्या, मग मी अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवून दाखवेन.
इम्तियाज जलील म्हणाले, नवनीत राणांनी मला आव्हान दिलं आहे की, हिंमत असेल तर अमरातीतून निवडणूक लढून दाखवा. मी त्यांना एवढंच सांगेन की, मला खोटं जातप्रमाणपत्र मिळवून द्या, मग मी अमरातीतून लोकसभा लढवेन. तुम्ही ज्या पद्धतीने बोगस जातप्रमाणपत्र मिळवलंत आणि त्या प्रमाणपत्राच्या जोरावर पाच वर्षे सत्ता उपोभगली ते सर्वांना माहिती आहे. हे केवळ मी बोलत नाही, तर उच्च न्यायालयाने देखील तसंच म्हटलं आहे. तुम्ही मला आव्हान देत असाल तर मी नक्कीच तयार आहे. तुम्ही हे सगळं सुरू केलं आहे आणि मी या सगळ्याचा अंत करेन.
तीन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात नवनीत राणा म्हणाल्या होत्या, “मी संसदेत म्हटलं होतं की या देशात राहायचं असेल तर ‘जय श्री राम’ म्हणावं लागेल. नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी आम्ही अमरावतीत येऊ, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. पण त्यांच्यासारखे किती आले आणि किती गेले. हिंमत असेल तर त्यांनी अमरावतीमध्ये येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवावी. मला पराभूत करून दाखवावं.” या आव्हानाला आता खासदार जलील यांनी उत्तर दिलं आहे.
हे ही वाचा >> “भाजपासाठी ३७० जागा जिंकणं अवघड, तर काँग्रेस…”, प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला लोकसभेच्या निकालाचा अंदाज
“तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले”
नवनीत राणा म्हणाल्या होत्या, “इम्तियाज जलील यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवली नाही, तर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये तरी कसे निवडून येतात, ते मी बघते. इम्तियाज जलील हे असदुद्दीन ओवैसी यांचे चमचे आहेत. संभाजीनगरचे लोक यावेळी जलील यांना निवडून येऊ देणार नाहीत. माझी विचारधारा माझ्याबरोबर आहे. तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले. मी एक महिला आहे. मी पदर खोचून मैदानात उभी राहिले तर तुम्हाला पराभूत करेन. मी जलील यांना घाबरणारी नाही.