अहिल्यानगर: शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रवेश क्षमतेच्या जवळपास दुपटीने अर्ज आले; मात्र तरीही ३०३ जागा रिक्त राहिल्या आहेत. या प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे प्रवेश घेण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही या जागा रिक्त राहिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून या संदर्भातील आकडेवारी उपलब्ध झाली. त्यानुसार जिल्ह्यात ३४८ शाळांमधून ३ हजार २६१ विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ च्या माध्यमातून २५ टक्के प्रवेशासाठी जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रवेशासाठी जिल्ह्यातून ८ हजार ३८७ वर अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीद्वारे ४ हजार ५१० अर्ज पात्र ठरले. त्यातून २ हजार ९५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत पूर्ण झाले आहेत.

समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांसाठी ‘आरटीई’अंतर्गत अल्पसंख्याकांच्या शाळावगळता खासगी शाळांमधून २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या घटकातील विद्यार्थी जास्त प्रवेशशुल्क असलेल्या शाळांमधून शिकू शकत नाहीत. त्यामुळे आरटीईअंतर्गत अशा मुलांना खासगी शाळात जागा राखीव ठेवल्या जातात.

यापूर्वी ही प्रक्रिया दर डिसेंबरपासून सुरू करण्यात येत होती आणि एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित होत होते. यंदा मात्र एक महिना विलंबाने म्हणजे जानेवारीपासून प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली. ती मेअखेरपर्यंत राबवण्यात आली. त्याचाही परिणाम प्रवेशावर झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. तरीही ३०३ जागा रिक्त राहिल्या आहेत.

यापूर्वी आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अधिक मागणी असे. ती आता काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. यंदाच्या प्रक्रियेत ४६ अर्ज रद्द करण्यात आले. एकाच विद्यार्थ्याने अनेक जागांसाठी अर्ज केले, असे १ हजार ४७७ अर्ज प्राप्त झालेले होते.

जिल्ह्यात तालुकानिहाय शाळा व तेथे आरटीईअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे- कंसामध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या- अकोले १३ (१३०), जामखेड ९ (६१), कर्जत १८ (११७), कोपरगाव २३ (२४१), अहिल्यानगर शहर २१ (२१८), अहिल्यानगर तालुका ४२ (२६५), नेवासा २७ (२१५), पारनेर २३ (१८१), पाथर्डी १९ (१२२), राहता ३६ (४०४), राहुरी २५ (२३३) संगमनेर २५ (२८५), शेवगाव २७ (१८५), श्रीगोंदे १६ (७९) व श्रीरामपूर २४ (१२२).