अलिबाग : ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करून त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्याच्या वारसास्थळांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधी स्थळाचे सुशोभिकरण प्रकल्पाअंतर्गत पाच कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भुमिपूजन समारंभात त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे आपल्या जिवनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे त्यांनी केलेले कार्य, त्यांचा वारसा पुढे नेणे गरजेचे आहे. आपला इतिहास जोपासणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि कान्होजी आंग्रे यांना मानवंदना ठरेल असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. समाधीस्थळाच्या सुशोभिकऱणाचे पहिल्या टप्प्यातील काम आज सुरू होत आहे. हे काम सुरू असतांनाच दुसऱ्या टप्प्यातील कामे प्रस्तावित करून त्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा म्हणजे उर्वरीत निधी मंजूर करता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : अन् विद्यार्थ्यांसह शिक्षिकेनेही धरला ‘भारत का बच्चा बच्चा’ गाण्यावर ताल, व्हिडीओ एकदा पहाच…

अलिबाग शहराच्या विकासाठी १२५ कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहे. ही कामे लवकरच सुरू होतील असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी व्यक्त केला. आंग्रे समाधिस्थळाच्या सुशोभिकरणासाठी आदिती तटकरे पालकमंत्री असतांना प्रादेशिक पर्यटन योजनेतून दोन कोटींचा निधी मंजूर केला होता. या कामासाठी आणखिन निधी लागणार असल्याने नाविन्य पुर्ण उपक्रमातून तीन कोटी रुपयांचा निधी मी मंजूर करून घेतला. त्यामुळे समाधीस्थळाच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामे आता पूर्ण केली जातील. नंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही आमदार दळवी यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : “…पण आम्ही महिला ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’चं म्हणू”, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणती कामे होणार

आंग्रे समाधीस्थळ उद्यानाच्या प्रवेश द्वारावर भव्य गलबताच्या प्रतिकृतीची उभारणी करणे, संरक्षक भिंतीवर कोरीव काम करून, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, एफआरपी मटेरियलच्या दिपमाळांची उभारणी करणे, कान्होजी राजे आंग्रे यांच्या जीवनावरील म्यूरल्स तयार करणे, उद्यानात रोषणाई करणे यासाठी लागणारे आवश्यक बांधकामे करणे. ही कामे या योजनेअंतर्गत केली जाणार आहेत.