अलिबाग – चार वर्षानंतरही अलिबाग येथील शासकीय मुकबधीर विद्यालयाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे भाड्याच्या जागेत शाळा चालवण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर आली आहे. ही जागा अपुरी असल्याने अनेक गैरसोयीना विद्यार्थी आणि शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.
विद्यानगर येथील मुकबधीर विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचा शुभारंभ १५ ऑगस्ट २०२१ साली तत्कालीन पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते झाला. हे काम दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२५ संपत आले तरी इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. मुकबधीर विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या अनास्थेमुळे भाड्याच्या शाळेतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. ठेकेदाराच्या निष्क्रयतेमुळे विद्यार्थ्यांची परवड सुरुच आहे.
गेली ३५ वर्ष विद्यानगर येथे शासकीय मुकबधीर विद्यालय कार्यरत होते. मात्र इमारत जीर्ण झाल्याने त्याठिकाणी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने स्वनिधीतून दोन कोटी ४६ लाख ९२ हजार रुपयांची तरदुत केली. ३१ गुंठे क्षेत्रात असलेल्या या जागेत एक मजली इमारत बांधली जाणार होती. त्यामध्ये आठ वर्ग खोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थान, विद्यालयातील अधिक्षकांसाठी कार्यालय व निवासस्थान, श्रवण चाचणी खोली, वैद्यकिय कक्ष, अंतर्गत खेळाची खोली व सुसज्ज असा सभागृह असणार होता.
मूकबधिर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी गार्डन, क्रीडांगण तसेच भोजन कक्ष, स्वयंपाकी निवासस्थान, व्यवसायिक प्रशिक्षण हॉल, पहारेकरी निवासस्थान आदी सुविधा उपलब्ध होणार होत्या मात्र गेल्या वर्षभरापासून मुकबधीर विद्यालयाचे काम जवळपास ठप्प झाले आहे. त्याचा फटका मुकबधीर विद्यार्थ्यांना व कर्मचार्यांना बसत आहे. सध्या मुकबधीर विद्यालय भाड्याच्या घरात आहे. परंतू पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व तेथील कर्मचार्यांना शिकविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे उर्वरीत काम करून घेण्याची मागणी केली जात आहे.
नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रीया बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. कामासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन ठेकेदार नेमून उर्वरीत काम पूर्ण केले जाईल. – पवनकुमार नजन, प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण विभाग राजिप