बीड – चार महिन्याच्या चिमुकल्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून वडिलांनी नंतर आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा जवळील रामनगर याठिकाणी शुक्रवार दि.०३ रोजी घडली. कौटुंबिक भांडणातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील रामनगर भागात पती-पत्नीतील वादातून हतबल होऊन अमोल हौसराव सोनवणे (वय ३०) यांनी आपला केवळ चार महिन्यांचा मुलगा पाण्याच्या बॅरलमध्ये टाकले. बॅरलमध्ये पाणी असल्याने चिमुकल्याचा बुडून जागीच मृत्यू झाला. यानंतर अमोल याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.
अमोल आणि त्याची पत्नी पायल यांच्यात वाद होत होते. अमोल याचे दुसरे लग्न झालेले होते. दोन वर्षांपूर्वी पहिली पत्नी सततच्या वादातून बाहेर निघून गेली होती. अमोल सोनवणे हा ट्रॅक ड्रायवर असून त्याला दारूचे व्यसन असल्याने पत्नीचा आणि त्याचा सतत वाद होत होता, अशी माहिती समोर आली आहे.
चार दिवसांपूर्वीही दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद टोकाला पोहचला आणि दोघांनीही कीटकनाशक प्राशन केलेले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती. त्यानंतरही वादातूनच शुक्रवारी सकाळी अमोलने चिमुकल्यास उचलले आणि घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवले. नाका तोंडात पाणी जाऊन बुडून बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर नजीकच अमोलनेही गळफास लावून घेतला. अमोल हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याची माहिती पुढे आली आहे.