धुळे : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शिंदखेडा तालुक्यात १२२ गावामधील ४६ हजार २८६ हेक्टर, शिरपूर तालुक्यातल्या ३४ गावातील एक हजार ५०५ आणि साक्री तालुक्यात ९ गावातील १४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. धुळे तालुक्यातही शेकडो हेक्टर शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील शिरपूर आणि शिरपूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाचे पीक मातीमोल झाले असून, तालुक्यातील ३४ गावे बाधित झाल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे.

महसूल विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार एकूण एक ९९७ शेतकऱ्यांच्या अंदाजे एक हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, मका, बाजरी, खरीप ज्वारी आणि तूर या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतातील पिके पाण्यात बुडाली असून, तर काही भागांत वार्‍याच्या तीव्र झोतामुळे पिके आडवी होऊन जमिनीत मिसळली आहेत.

या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ नुकसान पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यानुसार प्राथमिक अहवाल तयार करण्यात येत आहेत. काही गावांमध्ये पंचनामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून, उर्वरित ठिकाणी ते युद्धपातळीवर सुरू आहेत.

काही भागांत मक्याच्या शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. त्या अहवालाच्या आधारे शासनस्तरावर मदत मंजूर केली जाईल. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाकडून सर्व पंचनामे पारदर्शकपणे केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पावसाचा फटका कापूस, मका, बाजरी, खरीप ज्वारी यांसह इतर पिकांना बसला आहे. कृषी विभागाने पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार शिंदखेडा तालुक्यात १२२ गावामधील ४६ हजार २८६ हेक्टर क्षेत्र , शिरपूर तालुक्यातील ३४ गावातील १५०५ हेक्टर क्षेत्र, साक्री तालुक्यातील ९ गावातील १४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. धुळे तालुक्यातही शेकडो हेक्टर शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे.

नुकसानीचे वास्तव चित्र समोर आणण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने पंचनामे सुरू केले आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या मार्फत पंचनामे जलदगतीने सुरू असून प्रत्यक्ष शेतपातळीवरील तपासणी केल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.