हिंगोली : जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटला आहे. ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या अनावश्यक कामाला स्थगिती देण्याची लेखी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आमदार मुटकुळे यांनी हिंगोली शहरात मंजूर करण्यात आलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या कामांची आवश्यकता नसतानाही ती मंजूर करण्यात आली आहेत. प्रत्यक्ष पाहणी न करता फक्त कागदोपत्री निर्णय घेतले, असे मुटकुळे यांनी म्हटले आहे. या अनावश्यक मंजूर कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या पत्रानंतर महायुतीत बेबनाव असल्याचे समोर आले आहे.

पालकमंत्री झिरवळ यांच्या जिल्ह्यातील उपस्थितीबाबतही गेल्या काही महिन्यांपासून असमाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या प्रमुख पदावर असूनही ते नांदेड येथे मुक्कामी थांबतात आणि हिंगोलीत काही तासांसाठी येतात, अशी नाराजी व्यक्त केली जाते. अतिवृष्टीनंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा न केल्यानेही त्यांच्यावर टीका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून झिरवळ यांची कार्यशैली बदलण्याची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘पालकमंत्री मोठा जिल्हा सांभाळू इच्छित असतील तर त्यांना तशी संधी द्यावी, या शब्दात पालकमंत्रीच बदला, असे सूचविण्यात आले आहे. अनावश्यक पथदिवे, हायमास्ट, एलईडी लाईट या कामांवर दोन कोटींचा निधी खर्च करण्याच्या प्रस्तावास पालकमंत्री यांनी मंजुरी दिली. वास्तविक त्या भागामध्ये रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यासह इतर कामांची आवश्यकता आहे. म्हणून पालकमंत्र्यांनी अनावश्यक मंजूर केलेल्या कामाच्या प्रस्तावास स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.