कराड: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अजरामर विचार अन् साहित्याने स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांना राष्ट्रभक्तीने प्रेरित केले. त्यांचे लेखन विज्ञाननिष्ठ, हिंदुत्वाच्या तात्त्विक अधिष्ठानावर आधारलेले, भविष्याचा वेध घेणारे असून, त्यात पुरोगामित्व व वास्तववादाचा संगम आहे. त्यामुळेच वर्तमान परिस्थितीत सावरकरांचे विचार अन् साहित्य हे कालसुसंगत, प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमी, दिल्लीचे सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीतर्फे सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजिलेल्या ‘सावरकर साहित्य- काल, आज, उद्या’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी होते तर, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, समीर जोशी, वि. के. जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. नरेंद्र पाठक म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजसेवक, क्रांतिकारी, तत्त्वज्ञ, लेखक, महाकवीच. त्यांनी अनेक कविता, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ, स्फुटलेखन, पोवाडे, फटका, नाटके, निबंध, आत्मचरित्र, चरित्र आणि पत्रे लिहिली आहेत. भाषा, लिपी शुद्धीतही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मराठीची पंधरा हजार, इंग्रजीची दीड हजार पाने आणि उर्दू भाषेत गझलही लिहिली. सावरकरांची ४५ पुस्तके व ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांच्यावर अनेक साहित्यिकांनी लेखन केले. अनेकांनी चित्रपटही काढले. त्यामुळे सावरकर राष्ट्रविचारांचा सागरच असल्याचे पाठक म्हणाले.
दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील साहित्यिकांची भाषणं, वैचारिक प्रगल्भता पाहिल्यानंतर सावरकरांच्या साहित्यिक अधिष्ठानाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. लेखक कितीही प्रतिभावंत असला, तरी त्याच्या लेखणीला अन् विचारांना राष्ट्रीय अधिष्ठान हवे, साहित्यिकांच्या बोलण्यातून आणि लेखणीतून एकसंध समाजासह वैभवशाली राष्ट्र उभारायचे असते. पण, वर्तमानातील साहित्यिक समाजात भेदभाव निर्माण करत असल्याने अशांचा समाजरचनेतील उपयोग शून्य आहे. मराठी साहित्यिकांनी भाषा, साहित्याला एका उंचीवर नेण्याऐवजी ज्ञान पाजळून साहित्य संमेलनाची बदनामीच केल्याची टीका पाठक यांनी केली.

टिळकांना ‘लोकमान्य’, गांधींना ‘महात्मा’ या पदव्या जनतेनेच दिल्या. त्याप्रमाणे सावरकरांचा उल्लेख जनतेनेच ‘भारतरत्न’ असा करावा. सरकार पुरस्काराने त्यांचा गौरव करेल; तेव्हा करेल. परंतु, भारतरत्न म्हणून सावरकरांची ओळख बनून राहील, अशी अपेक्षा पाठक यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात दिलीप गुरव यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीच्या वाटचालीचा आणि कार्याचा आढावा सादर केला.