रत्नागिरी : कोकणात माकडांनी मोठा उच्छाद मांडला आहे. या माकडांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे शेतक-यांने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आंबा, काजू बागांसह फळपिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांना पकडण्याची मोहीम आंबा हंगाम सुरू होण्याआधी करण्यात येणार आहे. यासाठी ३५ लाख रुपये खर्च येणार असल्याने यासाठी राज्य शासनाकडे याचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठवण्यात आला असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंबा आणि काजू याबरोबर इतर फळांचे उत्पन्न घेतले जाते. याबरोबर भाजी पाला व भात शेती कोकणात केली जाते. मात्र गेली काही वर्ष फळबागा आणि शेतीपिकांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाला आहे. दरवर्षी त्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी गोळप येथील शेतकरी अविनाश काळे आणि बागायतदारांनी माकड, वानरांपासून होणाऱ्या उपद्रवाबद्दल आवाज उठविला होता. त्यासाठी आंदोलनही केले होते. माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला समोर जावे लागत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत, सिंधू-रत्न योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्यापुढे मांडला होता. त्यांनी वानर पकडण्याच्या मोहिमेसाठी निधी देऊ अशा सूचना दिल्या आहेत. या सुचनेनुसार उपाययोजना म्हणून माकडे पकडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाकडून निधी मिळाल्यानंतर माकड पकडण्यासाठी दोन पिंजरेही घेण्यात आले. मे महिन्यात गोळप येथे माकड पकडण्याचे प्रात्यक्षिकही केले गेले. त्यामध्ये सुमारे काही माकडे पकडली गेली. त्यांना अभयारण्यात सोडण्यात आले. त्यानंतर वानर विभागिय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या सूचनेनुसार ३५ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसात माकड पकडण्याची मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे रत्नागिरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा.. Pune Rain Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ऐनवेळी रद्द; ‘हे’ दिलं कारण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्बिजीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे

वानर आणि माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भात मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये कोकणातील आमदार, कोकण कृषीविद्यापीठाचे प्राध्यापक, कृषी आयुक्त आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी यांचा अभ्यासगट समाविष्ट होता. त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये माकड, वानर यांची प्रगणना करण्यात आली. त्यानंतर शासनाने माकडांच्या निर्बिजीकरणाचा उपाय सुचविला आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील माकडांची, वानरांची धरपकड करून निर्बिजीकरण मोहीम राबवण्याचा प्रस्ताव कोल्हापूर विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे.