सोलापूर : ज्यांनी जन्म देऊन, मोठे कष्ट करून घडविले आणि मोठे केले, त्या मुलांनी वयोवृद्ध पित्याला न सांभाळता, त्रास देऊन घरातून हाकलून दिल्याचा प्रकार माढा तालुक्यातील एका गावात घडला. याप्रकरणी पीडित पित्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याची दोन्ही मुले आणि सुनांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पीडित ७५ वर्षांचे असून, त्यांनी दोन्ही मुलांना लहानाचे मोठे केले.
नोकरी मिळवून दिली आणि विवाह करून दिला. आयुष्याच्या सायंकाळी मुलांनी वडिलांच्या आधाराची काठी होणे अपेक्षित असताना, त्यांच्या नशिबी मुले आणि सुनांकडून शारीरिक व मानसिक जाच आला. शरीर झिजले असताना त्यांचे दैनंदिन पालनपोषण करणे दूर, पण मुलांनी जन्मदात्याला घरात राहणे मुश्कील केले. यात सुनांनीही हातभार लावला. एके दिवशी वृद्ध पित्याला थोरल्या मुलाने शिवीगाळ करून त्यांच्यावर फरशीच्या तुकड्याने हल्ला केला. धाकटा मुलगा आणि दोन्ही सुनांनीही शिवीगाळ करून त्यांना घरात पुन्हा यायचे नाही, घरात जेवण मिळणार नाही, असे धमकावत त्यांना हुसकावून लावले. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक आणि पालकाचे पालनपोषण अधिनियम कायद्यानुसार पोलिसांनी पीडित वृद्धाच्या दोन्ही मुलांसह सुनांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.