वाई : पर्यटक घोड्यावर सवारी करत असताना घोडा पाय घसरून थेट दरीनजीक तीस फूट खोल खड्ड्यामध्ये कोसळला. यावेळी घोड्यावरून पर्यटकाने उडी मारल्याने सुदैवाने पर्यटक युवक बचावला. घोडा व पर्यटक जखमी झाले. घोड्यास दोन तासांच्या प्रयत्नाने खड्ड्यामधून बाहेर काढण्यात यश आले. सध्या दिवाळी हंगामामुळे पर्यटकांची महाबळेश्वर, पाचगणी या गिरिस्थळी गर्दी झाली आहे. प्रसिद्ध लॉडविक पॉईंट परिसरातील डेन टू बियर शिबा या राईड वर पर्यटक स्वतः सवारी करत असताना घोडा पाय घसरून थेट दरी नजीक असलेल्या तीस फूट खोल खड्ड्यामध्ये कोसळला.

प्रसंगावधान राखत घोड्यावर असलेल्या पर्यटक युवकाने उडी मारली. या पर्यटक युवकास किरकोळ दुखापत झाली आहे, तर घोडा देखील जखमी झाला. दोन तासांच्या प्रयत्नाने या घोड्यास खड्ड्यामधून बाहेर काढण्यात यश आले. महाबळेश्वर येथे घोडे अपघाताची मालिका सुरूच आहे. घोडे व्यावसायिकांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून येते.

हेही वाचा : ‘स्वआधार’ला शासनाचा बालस्नेही पुरस्कार; बालकांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल

शहरापासून अंदाजे पाच कि.मी अंतरावर प्रसिद्ध लॉडविक, हत्तीचा माथा हे पॉईंट आहेत. हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. वाहनतळापासून काहीश्या अंतरावर हे मुख्य प्रेक्षणीय स्थळ असून एका बाजूला डेन टू बियर शिबा ही जंगलातील राईड आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लॉडविक पॉईंट पाहण्यासाठी पुणे येथून पर्यटक युवकांचा एक ग्रुप आला. या ग्रुपमधील एका पर्यटक युवकाने घोड्यावरून रपेट मारण्यासाठी घोडे व्यावसायिकाला सांगितले. घोडे व्यवसायिकाने कोणत्याही प्रकारची काळजी न घेता खोल दरी असलेल्या या राईडवर पर्यटकांसह घोडे सोडले अन् घोडे पाय घसरून थेट दरी नजीक असलेल्या तीस फूट खोल खड्ड्यात कोसळले.