सावंतवाडी: मालवणच्या राजकोट किल्ल्यापासून सुमारे पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर असलेल्या आणि अठराव्या शतकात (१८१५) बांधण्यात आलेल्या दोन ब्रिटिशकालीन स्मारकांची अज्ञातांकडून तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तोडफोडीत स्मारकांमध्ये बसवलेल्या संगमरवरी पाट्याही चोरून नेल्या गेल्या आहेत, ज्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त होत आहे.

​सन १८१५ मध्ये कमांडिंग कर्नल रॉबर्ट वेब, सार्जंट जॉन गार्वेन यांच्यासह अन्य अधिकारी, सैनिकांचे एक मोठे व्यापारी जहाज वेंगुर्ल्याहून मालवणच्या दिशेने येत असताना राजकोट येथील समुद्रातील खडकांचा अंदाज न आल्याने अपघातग्रस्त झाले होते.

​या दुर्घटनेत कर्नल रॉबर्ट वेब आणि सार्जंट जॉन गार्वेन यांच्यासह जहाजावरील सर्व व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता.​ त्यावेळी त्यांच्या साथीदारांनी राजकोट येथे जागा घेऊन या दोघांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्मारके बांधली होती, तर काहींची थडगीही उभारली होती. दोन शतकांहून अधिक काळ ही स्मारके या ठिकाणी उभी होती.

​अलिकडच्या काही दिवसांत या ऐतिहासिक स्मारकांची अज्ञाताने तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे, दोनशे वर्षांपूर्वीच्या या जहाज दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या काही नातेवाईकांनीही गेल्या काही वर्षांत या स्मारकांना भेट दिल्याची माहिती आहे. ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा असूनही तो असुरक्षित असल्याबद्दल इतिहासप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

​मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रेरणात्सव समितीचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ राणे यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून या घटनेची तात्काळ चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.