अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे एका २२ वर्षीय तरुणाची ठेचून हत्या करण्यात आली. हत्या करून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने जेरबंद केले. कर्जत वेणगाव येथील कुणाल अरूण आंब्रे या तरुणाची हत्या करण्यात आल्याची बाब रविवारी सकाळी समोर आली. कर्जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला समांतर तपास करण्याचे निर्देश दिले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांनी तपासाची सूत्र हातात घेतली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांच्या नेतृत्वाखाली या दोन पथकांचे गठन करण्यात आले. दोन्ही पथकांनी घटनास्थळाची पहाणी केली. माहिती संकलन सुरू केले. तेव्हा मयत कुणाल आंब्रे यांच्यावर यापुर्वीही तीन वेळा हल्ले झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. तांत्रिक तपास करून पोलीसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपी निश्चित केले. त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा हे आरोपी पनवेलच्या दिशेने जात असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. तेव्हा पोलीसांनी सापळा रचून नाका बंदी सुरू केली. महिंद्रा कंपनीच्या गाडीतून जाणाऱ्या या आरोपींना पोलिसांनी गाडी थांबविण्याचे निर्देश दिले. मात्र त्यांनी गाडी न थांबवता तिथून पळ काढला.
हेही वाचा : ..हा आहे भारतातील एकमेव व्याघ्रप्रकल्प, येथे ‘मेलेनिस्टिक’ वाघ आढळतात
यानंतर पोलीसांनी पाठलाग करून आरोपींची गाडी अडवली, आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पुर्ववैमनस्यातून ही हत्त्या केल्याची कबुली त्यांनी दिली. घटनेच्या सहा तासांच्या आत आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले. आरोपींना कर्जत पोलीसांच्या ताब्यात दिले. या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, सहाय्यक फौजदार प्रसाद पाटील, राजेश पाटील, पोलीस हवालदार सुधीर मोरे, यशवंत झेमसे, संदीप पाटील, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, रूपेश निगडे, पोलीस कॉन्स्टेबल स्वामी गावंड, अक्षय सावंत, अक्षय जगताप, सायबर सेलमधील पोलीस नाईक तुषार घरत यांनी महत्वाची भूमिका बजावली.