अलिबाग– गेल्या चार महिन्यापासून अलिबाग विभागातीलग्राहकांना वीज देयकांचे वितरण झालेले नाही. तर दुसरीकडे मीटर रिडींग घेतले जात नसल्याने, ग्राहकांकडून सरासरी काढून वीज देयकांची आकारणी सुरू केली आहे. महावितरणच्या वीज देयके वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या वीज देयकांच्या वितरणातील या गोंधळाला स्मार्ट मीटर कारणीभूत असल्याची चर्चा आहे. कमिशन घटणार असल्याने एजन्सीने काम करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

वीज ग्राहकांना दर महिन्याला साधारणपणे दरमहिन्याच्या १५ तारखेला वीज देयके प्राप्त होत होती. ज्या वीज देयकांचा भरणा साधारणपणे दरमहिन्याच्या ३० तारखेपर्यंत करणे अपेक्षित होते. मात्र मे महिन्यापासून अलिबाग विभागातील ग्राहकांना वीज देयके मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. वीज वितरण करणाऱ्या ठेकेदाराने काम बंद केल्याने वीज वितरण केले जात नसल्याचे सांगतले जात आहे.

एकीकडे वीज देयकांचे वितरण होत नाहीये तर दुसरीकडे मीटर रिडींग घेतले जात नसल्याने ग्राहकांकडून सरासरी वीज देयकांची आकारणी केली जात आहे. त्यामुळे महावितरणच्या वीज देयक वितरण व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सरासरी वीज देयकांच्या आकारणीमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. याबाबत महावितरणच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता वीज देयके कधीपासून वितरित होतील हे सांगता येणार नसल्याचे उत्तर दिले जात आहे.

ग्राहकांनी मोबाईलवर येणाऱ्या संदेशाव्दारे वीज देयके भरण्यास महावितरण कार्यालयाकडून सांगितले जात आहे. अन्यथा कार्यालयातील ग्राहक सेवा केंद्रात येऊन वीज देयकांची प्रत घेऊन जाण्यास सांगितले जात आहे. अथवा वीज देयके ऑनलाईन मिळण्यासाठी ई मेल रजिस्टर करण्याचे सल्ले दिले जात आहेत. त्यामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यात वाद निर्माण होत आहेत. नियमित वीज देयके मिळाली तर वीज देयकांचा भरणाही नियमित होईल त्यामुळे महावितरणने तातडीने वीज देयकांचे वितरण सुरू करावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

सोलार रुफ टॉप योजनेचे ग्राहकांना ऑनलाईन पध्दतीने वीज बीले दिली जातात. मात्र ही देयकेही नियमितपणे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मीटर रिडींग घेतले जात नसल्याने सोलार रुफ टॉप योजनेच्या लाभार्थ्यांना वीज देयके दिली नसल्याचे माहिती महावितरणच्या सूत्रांकडून देण्यात आली.

गोंधळाला स्मार्ट मिटर कारणीभूत?

या वीज वितरणातील या गोंधळाला स्मार्ट मीटर कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. स्मार्टमीटर बसवण्यास सुरवात केल्याने मीटर रिंडीग प्रक्रीया ओनलाईन पध्दतीने सुरु होणार आहे. त्यामुळे मीटर रिडींग करणाऱ्या आणि वीज देयकांचे वाटप करणाऱ्या एजन्सीचे कमिशन कमी होणार आहे. कमी झालेल्या कमीशनमध्ये एजन्सी काम करण्यास उत्सूक नसल्याने, मीटर रिडींग घेणे आणि वीज देयके वाटणे एजन्सीच्या लोकांनी बंद केल्याची चर्चा आहे.

गेली चार महिने महावितरणकडून वीज बीले दिली जात नाहीत. या संदर्भात वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. – प्रमोद घासे, ग्राहक

मीटर रिडींग उपलब्ध नाही म्हणून साडे चार हजार रुपयांचे बिल पाठवले, जेव्हा महावितरणच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली तेव्हा आमच्याकडे मीटर रिडींग घेण्यासाठी माणसेच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. – धीरज ओसवाल, ग्राहक

वीज देयके वाटप करणाऱ्या एजन्सीकडून वीज वितरणाचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीज देयकांचे वितरण आम्ही सुरू केले आहे. नवीन एजन्सी नेमण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. – शैलेश कुमार, कार्यकारी अभियंता महावितरण, अलिबाग